माळशेज घाटात पर्यटकांकडून खुल्या पर्यटनाचा दुरूपयोग: दारू व पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच ; अनेक पर्यटकांची दारू बंदीची मागणी

446
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : गेल्या दोन वर्षापासून माळशेज घाटात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पर्यटनावर बंदी होती. मात्र यंदा ही बंदी उठवण्यात आली. मात्र माळशेज घाटातील खुल्या पर्यटनाचा काही पर्यटकांनी गैरफायदा घेतं दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याने अनेक पर्यटकांनी दारू बंदीची मागणी करत पर्यटन स्थळी दारू येतेच कशी? असा सवाल केला आहे. पर्यटकांनी माळशेजघाट जरी फुलला असला तरी पर्यटकांनी पिऊन रिकाम्या केलेल्या दारुच्या बाटल्यांनी पर्यटन निवासाची खराब करून टाकले आहे. पावसाळा सुरु झाल्या पासून पर्यटकांनी  माळशेजघाटात हजेरी लावण्यास सुरूवात केली होती.  मात्र आता दारूच्या रिकाम्या बाटल्यांनी हजेरी लावली असून,  पर्यटन निवासाची  दारू अड्डा  म्हणण्याची वेळ दारुड्यांनी आणली आहे. यामुळे निसर्गरम्य माळशेजघाटाच्या पर्यटनाला गालबोट लागले आहे. व या पेताड पर्यटकामुळे माळशेजघाट बदनाम होत आहे. दरवर्षी पोलीसांची नाकाबंदीमुळे दारू नेण्यावर नियंत्रण ठेवले जायचे. मात्र यंदा ही यंत्रणा फोल ठरली आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेजघाटात  शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवसात हजारों पर्यटक हजेरी लावतात, काही पर्यटक कुटंबासह पर्यटन विकास महामंडळाचे रुम भाड्याने घेऊन राहतात. या घाटात कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना दारुड्यांचा ञास होऊ नये, तसेच दारु पिलेला एखादा पर्यटक नाचण्याच्या नादात तोल जाऊन पडू नये म्हणून या ठिकाणी येणा-या पर्यटकांची पोलिसांकडून तपासणी केली जाते. ही तपासणी मोरोशी व माळशेजघाटात केली जाते. माञ तपासणी करुन देखील पर्यटन विकास महामंडळाच्या आवारात देशी दारुच्या रिचवलेल्या बाटल्यांचा ढिग पहायला मिळत आहे. या ठिकाणी दारु येते कशी ? हा प्रश्न विचारला जात आहे. पावसाळा सुरू झाला की माळशेजघाटातील मुख्य धबधबे सुरु होतात. या धबधब्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शनिवार व रविवार या दोन दिवसात हजारो पर्यटक हजेरी लावतात. माळशेज घाटाच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यांतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान आहे. या ठिकाणी या काळात सर्व खोल्या बुकिंग असतात. ही बुकिंग ऑनलाइन केली जाते. आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था केलेली असते, माञ मद्यपान करण्यास मनाई असते. या पुर्वी दारुच्या नशेत काही जण घाटात पडल्यामुळे ही काळजी घेतली जाते. तसेच टोकावडे पोलीस व उमरोली येथील महामार्ग पोलीसाकडून वाहनांची कडक तपासणी केली जाते. त्यामुळे घाटात दारु घेऊन जाणा-यांना पायबंद घातला जातो.
   या पर्यटन स्थळांवर दारू येतेच कशी ? अशी विचारणा टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराड यांना केली असता. त्यांनी चौकशी करुन सांगतो असे उत्तर दिले. तर पर्यटन निवासाचे व्यवस्थापक अमोल भारती यांना या बाबत विचारणा केली असता, हे काम पोलिंसांचे असल्याचे सांगत या प्रश्नाला बगल दिली. तर राष्ट्रीय महामार्ग उमरोली पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरिक्षक मतकरी यांना विचारले असता आम्ही पर्यटकांच्या गाड्यांचे फक्तं पेपर तपासणी करतो असे सागितले. अशी स्थिती असताना पर्यटन स्थळांवर दारू कोण रोखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दारुड्या पर्यटकांनमुळे माळशेज घाट बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *