जांबुत परिसरात ड्रोनद्वारे बिबट्यांचा शोध सुरु – १८ पिंजरे ही वन विभागाकडून तैनात 

1036
        शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील काही दिवसांत शिरूरच्या बेट भागातील जांबुत परिसरात बिबटयांकडून सातत्याने उपद्रव होत असून बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. नुकताच येथील जोरीलवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पूजा नरवडे या १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मीडियातून या घटनेबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व बिबट्यांचा शोध व त्यांना बंदिस्त करण्यासाठी वन विभागाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली.
        शिरूर तालुक्यातील जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाकडून या परिसरात एकूण अठरा पिंजरे लावण्यात आले असून पावसाच्या व्यत्ययानंतर ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाच्या टीमने शर्तीचे प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली.वन विभागाचे सुमारे २५ ते ३० अधिकारी,कर्मचारी रात्रंदिवस या परिसरात गस्त घालत असल्याचे ते म्हणाले.
जांबूत येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पुजा नरवडेच्या घटनेने बेट भागातील नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. या हल्ल्यातील नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून वाईडलाईफच्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे. परंतु दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे ड्रोनला शोधकार्यात अडथळा येत होता.पाऊस उघडल्याने वनविभागाच्या वाईडलाईफच्या तज्ञ डॉक्टर व टीमचे शोधकार्य दिवसभर सुरु होते.
परिसरात ऊस पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होत आहे.ऊस पिक व ऊसातील मोकळ्या बांधचे ड्रोन कॅमेऱ्या द्वारे बारकाईने बिबट्याचा शोध सुरु आहे.रात्री बिबट्या एका पिंजऱ्या जवळ आला होता.  पिंजऱ्याला त्याने गोल गरका घेतला आहे त्याठिकाणी पाऊलखुणा दिसून येत आहे. या परिसरात एकूण अठरा पिंजरे लावण्यात आले आहे बिबट्याच्या पाऊलखुणा निश्चित करून तीन ठिकाणी पिंजरे बदलण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेरा ठराविक उंचीवर नेऊन बिबट्याचा माग घेण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *