मुरबाड रेल्वे स्थानकाला “शांताराम घोलप मुरबाड रेल्वे स्थानक” नावं द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

351
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते अशी ओळख असलेल्या माजी महसूलमंत्री व माजी खासदार शांताराम घोलप यांचे नाव नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला द्यावे. अशी मागणी करत “शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ असे स्थानकाचे नामकरण करावे, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मोदी@९ कार्यक्रमांतर्गत कल्याण येथे झालेल्या जाहीर सभेवेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाषणात नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच काँग्रेसचे माजी खासदार , माजी महसूल मंत्री शांताराम घोलप यांनी केलेल्या कार्याचे स्मरणही केले.
 विधानसभेच्या पाच निवडणुकांबरोबरच ठाणे लोकसभेची निवडणूक एकदा जिंकली. त्यांनी स्वकर्तृत्वाने ठाणे जिल्ह्यावर आपला ठसा उमटविला होता. राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्रीपद भूषवित काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण केली . मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून शांताराम घोलप यांची ओळख आहे. स्व. शांताराम घोलप यांची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी. त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गातील नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ नाव द्यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुरबाड रेल्वे स्थानकाचे जनक आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारामुळेच कल्याण-मुरबाड रेल्वेला मंजूरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली. राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला राज्य सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी दिली होती. त्यामुळे प्रकल्पाला वेग आला. आता नियोजित मुरबाड रेल्वेस्थानकाला `शांताराम घोलप-मुरबाड रेल्वे स्थानक’ असे नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *