शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक ) – सध्या मे महिना सुरु असून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात सातत्याने हवामान बदलत आहे. कधी कडक ऊन तर कधी गडगडाटासह वादळी पाऊस अशा परिस्थितीस शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम आता तोंडावर असून शेतातील पिकाचे किडीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण व्हावे म्हणून तालुका कृषी विभाग सतर्क झाला आहे. कवठे विभागाचे कृषी सहायक नंदू जाधव यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावा गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामापूर्वी शेतात हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हुमणी नियंत्रण सापळे कसे व किती महत्वाचे आहेत हे शेतकऱ्यांना समजेल अशा शब्दात प्रात्यक्षिकासह दाखवून देण्याचे काम करीत आहेत. याकामी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांचे मोठे मार्गदर्शन मिळत आहे.लवकरच पाऊसाला आता सुरुवात होईल. मग हुमणीचे प्रौढ भुंगेरे प्रजनना करीता बाहेर पडण्यास सुरुवात होईल. तेंव्हा सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात कडूलिंब आणि बाभळीच्या झाडांखाली अल्प खर्चाचे “प्रकाश सापळे” आतापासूनच लावावेत. आणि हुमणीचे भुंगेरे नष्ट करण्यास प्रयत्न करावा.
असा करा “प्रकाश सापळा”! “प्रकाश सापळा”
हा सापळा करण्यासाठी कडुलिंब तसेच बाभळीच्या झाडाखाली ३ मीटर लांब व १ मीटर रुंद सपाट वाफ्यात प्लास्टिक पेपर टाकून त्यात पाणी ओतावे. त्या पाण्यात १ लिटर डिझेल मिसळावे त्यावर एक ‘बल्ब’ लावायचा. (वीजेचा किंवा बॅटरी चार्जिंगवरचा.) त्या बल्बच्या खाली रात्री बल्बच्या प्रकाशाकडे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात. ते बल्ब वर बसल्यावर गरमीने खालील पाणी-डिझेल मिश्रीत द्रावणात पडतात. आणि मरतात. अंडी घालण्यापूर्वीच हे हुमणीचे भुंगेरे मेल्याने, नंतर हुमणी अळ्याच निर्माण होत नाहीत. आणि हुमणीपासून पुढे होणारे ऊस, सोयाबिन व इतर पिकांचे मोठे नुकसान टळते. तसेच हुमणी नियंत्रणावर होणारा प्रचंड त्रास टळतो, व त्यावरील खूप मोठा खर्चही वाचतो.एका प्रकाश सापळ्यात किमान २०० भुंगेरे अडकून पडून मरून जातात. एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालते . त्यातून किमान ५० हुमणीच्या अळ्या तयार होतात. जर २०० मादी भुंगेरे अशा प्रकाश सापळ्यांमध्ये मरून गेले, तर एका सापळ्यामुळे जवळपास १०,००० हुमणीच्या अळ्यांचे नियंत्रण या अत्यल्प खर्चाच्या सापळ्यांमुळे होते. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले, तरी १,००,००० हुमणी आळ्या आपण नष्ट करू शकतो. हे भुंगेरे मान्सून पाऊस सुरू होइपर्यंत म्हणजेच २० ते २५ जून पर्यंतच दिसतील. नंतर त्यांची अंडी अवस्था व अळी अवस्था सुरू होते. आणि मग नंतर हुमणी अळी नियंत्रित करणे हे काम अतिशय खर्चीक व अवघड काम होऊन जाते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आज पासूनच जास्तीत जास्त प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन नंदू जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.