नवीन धोरणातील शैक्षणिक रचनेमध्ये तीन ते आठ या वयोगटाचा ‘पायाभूत स्तर बालकांच्या सर्वांगीण विकासाला फायदेशीर ठरणार – पल्लवी देशमुख – नवीन शैक्षणिक धोरणातील बाबींचे कवठे बीट मधील सेविकांना प्रशिक्षण,मार्गदर्शन 

204
शिरूर,पुणे  – ( प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शासनाच्या नवीन धोरणातील शैक्षणिक रचनेमध्ये तीन ते आठ या वयोगटाचा ‘पायाभूत स्तर बालकांच्या सर्वांगीण विकासाला फायदेशीर ठरणार असल्याचे मत बालविकास प्रकल्प विभागाच्या कवठे बीटच्या पर्यवेक्षिका पल्लवी देशमुख यांनी व्यक्त केले. त्या आज शिरूर तालुक्यातील कवठे येमाई बीट मधील उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण,मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या.
स्वतंत्र भारताचे शिक्षणविषयक तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये जाहीर झाले. या धोरणातील नवीन दृष्टिकोन आणि शिफारशीमुळे सर्व राज्यांना शालेय शिक्षणाला नवसंजीवनी देण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने यावर व्यापक विचारमंथन घडवून आणले. या धोरणातील अपेक्षांची सांगड राज्याच्या गरजांशी घालून हे धोरण साकार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राज्यात सुरू आहे.
नवीन धोरणातील शैक्षणिक रचनेमध्ये तीन ते आठ या वयोगटाचा ‘पायाभूत स्तर’ या नावाने समावेश केला आहे. यात तीन ते सहा या बालशिक्षणाच्या वयोगटाचाही समावेश झाला आहे. हा बदल निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. श्री गिजुभाई बधेका, पद्मभूषण श्रीमती ताराबाई मोडक आणि पद्मश्री श्रीमती अनुताई वाघ यांनी बालशिक्षणाचे रोप भारतभूमीत लावले. एकात्मिक बालविकास योजना मधील अंगणवाड्यात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या संगोपनामुळे इ. स. १९७५ पासून बालशिक्षणाचे हे शेप बहरत राहिले. या निर्णयामुळे ते अधिक उमेदीने बहरून त्याचा वृक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन धोरणातील या शैक्षणिक रचनेमध्ये तीन ते सहा वयोगटाचा समावेश झाल्यामुळे राज्यात बालशिक्षणाचे पद्धतशीर रीतीने सार्वत्रिकीकरण करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची संधी महाराष्ट्र राज्याने देशात सर्वप्रथम घेतली. इ. स. २०१५ मध्ये ३ ते ५ या वयोगटासाठी ‘आकार’ हा बालशिक्षणक्रम तयार केला होता. हा आकार बालशिक्षणक्रम वापरून राज्यातील एकात्मिक बालविकास योजनेखालील जवळपास एक लाख, दहा हजार अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ पासून शिक्षण दिले जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे या ‘आकार’ बालशिक्षणक्रमाला अधिक समृद्ध रूप देण्याची संधी राज्याला मिळाली आहे. नवीन बालशिक्षणक्रम, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा – २०२२ यांच्याशी सुसंगत करण्यासाठी पायाभूत स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने तयार केला आहे.यात विज्ञानमय कोश ,प्राणायाम कोश,आनंदमय कोश,मनोमय कोश,अन्नमय कोश, पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रम आराखड्यातील शिक्षण विचारांचा लाभ राज्यातील बालकांना लवकर मिळणे गरजेचे आहे. पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यात राज्याने पाहिलेले बालविकासाचे एक भव्य स्वप्न आता बालशिक्षण मध्ये साकार करायचे आहे. हे काम बालशिक्षणच्या भविष्याची दोरी हाती असणान्या अंगणवाडी सेविकाच ‘शस्वीपणे पूर्ण करणार आहेत; म्हणून परिषदेमार्फत अंगणवाडी सेविकांसाठी पायाभूत स्तरावरील शिक्षण विचारांची तोंड ओळख करून देण्यासाठी आनंदी बालशिक्षण या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
शिरूरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले-झेंडे  यांच्या मार्गदर्शनानुसार आज कवठे बीटमध्ये येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित प्रशिक्षण मध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा: पायाभूत स्तर २०२४ सोबतच खेळणी आधारित अध्यापनशास्त्र व जादू याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बीट मधील सर्व अंगणवाडी सेविकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या अंगणवाडीतील बालकांचे शिक्षण आनंददायी करावे असे आवाहन ही पल्लवी देशमुख यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *