शिक्रापूर मध्ये विद्याधाम प्रशालेच्या दिंडीने दिला व्यसनमुक्तीचा धडा

159

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  आषाढी वारीच्या निमित्ताने विद्याधाम प्रशालेच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीचे प्रस्थान झाले ,त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे ,ग्रामपंचायत सदस्य श्रीपती भुजबळ , प्राचार्य सोनबापू गद्रे  उपमुख्याध्यापक सुरेश गंगावणे ,पर्यवेक्षक पोपट मेरगळ, यांनी पालखीचे पूजन केले दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जय घोष केला. विद्यार्थ्यांनी विविध संतांचे अभंग गायले, त्यानंतर पालखीचे प्रस्थान शिक्रापूर नगरीच्या दिशेने झाले. मुख्य पेठेतून पालखी मोठ्या आनंदात निघाली, यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांची वेशभूषा नववारी साडी कुर्ता पायजमा कपाळावरती गंध टिळा लेवून शोभा वाढवली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले आणि मुलांच्या हातामध्ये व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, पाणी आडवा पाणी जिरवा फलक उंचावून समाजाचे प्रबोधन केले. हा सोहळा शिक्रापूर नगरीतून मोठ्या दिमाखात भैरवनाथाच्या मंदिरापुढे येऊन थांबला. तेथे पुन्हा मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर करण्यात आला तेव्हा ग्रामस्थ ही सहभागी झाले. दिंडी पुढे हनुमान मंदिरापुढे आली. विद्यार्थ्यांनी रिंगण तयार केले. टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा फुगड्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांची फुगडी प्रेक्षणीय ठरली. शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे ,ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, शिक्रापूर समस्या ग्रुपचे अंकुश घारे यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुभाष कुरंदळे, ज्ञानेश्वर कुंभार, श्रीकांत दळवी, सुनील माने, विलास कांबळे ,किरण कोळी, दिपाली गावडे, अंजली जगताप, सुजाता गाडेकर ,कल्पना तोडकर या शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *