कवठे येमाई,पुणे : मिडगुलवाडी एक छोटेशे गाव पण दुष्काळच्या झळा मात्र कायमच्याच, दुष्काळात प्रशासनाने तात्काळ योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे

1085
            कवठे येमाई,पुणे : मिडगुलवाडी हे शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील कवठे येमाई ते कान्हूर मेसाई दरम्यान पूर्ण डोंगर पठारावर वसलेले एक छोटेसेच पण टुमदार गाव. पूर्णपणे पाऊसावर अवलंबून असलेली शेती.पाऊस जर बर्यापैकी पडलाच तर बाजरी,ज्वारी,वटाणे,काकडी,हुलगा,मटकी,भुईमूग ही जेमतेम पाऊस व पाण्यावर येणारी पिके हमखास घेतली जातात.व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा वार्षिक ताळेबंद तयार होत असतो पण मागील ३/४ वर्षांपासून या परिसरात पाऊसच अत्यंत अल्प प्रमाणात पडत असल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.कुटूंब चालविण्यासाठी पर्याय म्हणून येथील अनेक शेतकरी महिला जीव धोक्यात घालून टेम्पोने प्रवास करीत बागायत क्षेत्रातील शेती कामासाठी सुमारे २५ ते ५० किमी प्रवास करून
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे काम करीत आहेत.तर पुरुष मंडळीही परगावी जाऊन मिळेल ते काम करण्याचा प्रयत्न करीत
आहेत.  
        वरुण राजाने सातत्याने मागील ३/४ वर्षांपासून या भागाकडे पाठ फिरवली आहे. या वर्षी तर नोव्हेंबर,डिसेंबर २०१८ मध्येच हा परिसर म्हणजे तीव्र दुष्काळी भाग म्हणून पाहावयास मिळत होता. एरवी या दिवसात थोडीफार हिरवी दिसणारी शेती दुष्काळाच्या व पाणी टंचाईच्या तीव्र झळांमुळे उजाड झालेली दिसत आहे.येथील अनेक शेतकऱयांकडे जीवापाड जपलेली जनावरे आहेत. कोरड्या पडलेल्या विहिरी,तलाव,ओढे,नाले पाण्याचा कुठलाही श्रोत नाही. जीवन जगायचे कशे ? हा मोठा यक्ष प्रश्न येथील नागरिकांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. शासनाने यथे पाण्याचा टँकर सुरु केला आहे. नागरिकांना जेमतेम पुरेल असे पाणी उपलब्ध होत आहे. पण येथील अनेक शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जनावरांच्या चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील जनावरांसाठी चारा डेपो व पाण्याची नितांत गरज असून ही येथील शेतकऱयांना याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
  
          आगामी ६ महिन्यांचा पाऊस पडे पर्यंतचा काळ हा मिडगुलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांची खरी कसोटी पाहणारा ठरणार आहे.या वर्षी जानेवारीतच आज हा परिसर अत्यंत भकास दिसत आहे.येथील वनवावडी परिसरात असलेल्या एकमेव जुन्या विहीरीने तळ गाठलाय.नुकताच एका कंपनीने दिलेल्या सहकार्यातून ह्या विहिरीतील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे या विहिरी शेजारीच असना-या हापस्याला पाणी येऊ लागले आहे. सध्यस्थितीत हा हापसा परिसरातील नागरिकांना मोठाच  आधार ठरत आहे. पाण्याच्या शोधात अनेक शेतकरी लाखो रुपये खर्चून कर्ज काढून विहीर,बोअर घेत आहेत.पण जमिनीतच पाणी नाही तर विहिरी,बोअर ला कुठून पाणी मिळणार ? अशी अवस्था झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
          आगामी सहा महिन्यांचा काळ हा मिडगुलवाडी सह परिसरातील घोलपवाडी,फलकेवाडी,गारकोलवाडी,पुंडे मळा व इतर छोट्या मोठ्या वस्त्यांना अत्यंत कठीण जाणार आहे. या परिसरातील नागरीक व जनावरांना जगण्यासाठी टँकरच्या पाण्याच्या खेपा अधिकाधिक वाढविण्याची व चारा उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावरून युद्धपातळीवर कार्यवाही होण्याची गरज आहे. आहे. याच बरोबर येथील नागरिकांना हाताला काम मिळावे म्हणून परिसरात असणारे पाझर तलाव खोलीकरण,बांध बंदिस्ती,रोजगार हमीची काम सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे.या परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या या तीव्र दुष्काळात प्रशासनाने तात्काळ योग्य त्या उपाययोजना अवलंबल्यास येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल.
सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *