शिरूरच्या पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार 

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे –  शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडे पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज रविवार दि.१२ सकाळी पावणे दहा वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
          पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरा मागील शेतात जेसीबी चे काम सुरू होते.यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या चार फुट उंचीच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर  झडप टाकून ऊसात शिरला.आजोबा अरुण देवराम बोंबे यांनी दोनशे फुटांवरून हे पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या तावडीतून शिवन्या ला सोडवले.तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
      या घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलिपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.या घटनेने पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपरखेड जांबूत या दहा किलोमीटर परिसरात बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही सातवी घटना असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत असून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *