शिक्रापूर,पुणे : माध्यमिक शिक्षकांनाही जिल्हा परिषदेचे पुरस्कार सुरू, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांना माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून धन्यवाद

431
           शिक्रापूर,पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने  देण्यात येणारे जिल्हा पुरस्कार  काही वर्षांपासून  माध्यमिक शिक्षकांना देण्याचे बंद करण्यात आले होते. हे पुरस्कार फक्त प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत होते. परंतु  चालू वर्षी पासून  माध्यमिक शिक्षकांनाही  हे पुरस्कार  देण्यात येत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष  विश्वासराव देवकाते यांना माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत.

माध्यमिक शिक्षक संघाच्या गतवर्षीच्या तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते उपस्थित असताना माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे यांनी माध्यमिक शिक्षकांनाही जिल्हा परिषदेचे पुरस्कार सुरू करावेत अशी मागणी केली होती. माध्यमिक शिक्षक संघाची ही मागणी त्याचवेळी जि.प.अध्यक्षांनी मान्य करून पुढील वर्षीपासून हे बंद झालेले पुरस्कार माध्यमिक शिक्षकांना दिले जातील असे आश्वासन दिले होते.  व त्यानुसार चालू वर्षापासून पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकाप्रमाणे माध्यमिक शिक्षकांना हे पुरस्कार चालू केले आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला शब्द काटेकोरपणे पाळल्याने माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, राज्य कार्यकारणी सदस्य, धर्मेंद्र देशमुख व शिरूर तालुका अध्यक्ष अशोक दरेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवकाते यांची भेट घेवून धन्यवाद दिले व संघटनेच्या वतीने जाहीर आभाराचे पत्र दिले. यावेळी  माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांबरोबर चर्चा केली. शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी अध्यक्ष देवकाते यांनी सांगितले.

– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *