तांदळी,शिरूर : पाणी टिकवा,पाणी वाचवा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – जलनायक राजेंद्र गदादे

947

तांदळी,शिरूर : उद्या दि. २२ ला जागतिक जलदिन असून पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र निदर्शनास येत नाही.पाण्याचा योग्य तो वापर व पाण्याचे महत्व लक्षात घेत प्रत्येकाने पाणी साठवण व बचतीसाठी स्वतःहुन पुढाकार घेतल्यास पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पाणी टिकवा,पाणी वाचवा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे विचार शिरूर पंचायत समितीचे सदस्य तथा जलनायक राजेंद्र पोपटराव गदादे यांनी व्यक्त केले आहेत.

   शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी सारख्या एका छोट्याशा खेडेगावात वास्तव्यास असणारे पण बालपणीपासूनच शेती विकास व सामाजिक बांधिलकीचा वसा हाती घेतलेले जालनायक राजेंद्र गदादे यांनी आपल्या कल्पक विचारासारणीतून तांदळी,इनामगाव,बाभुळसर,गणेगाव दुमाला परिसरातील सुमारे २००० एकर क्षारपड जमिनीचा लोकसहभागातून कायापालट करीत ही जमीन लागवडी खाली आणण्याचे व या जमिनीत अतिरिक्त वापराने झालेले जादा पाण्याचे योग्य ते व्यवस्थापन करण्याचे उत्तम व आदर्शवत काम केले आहे.
 पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नैसर्गिक उद्भव अगदीच मोजके असल्याने  त्याचा वापर अत्यंत काटकसरीने करने म्हत्वाचे आहे. भविष्याचा विचार करता गोड पाण्याच्या श्रोतांचे योग्य ती देखभाल व जतन करणे देखील तितकेच पण अत्यंत महत्वाचे असल्याचे गदादे यांनी म्हटले आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या वतीने २२ मार्च १९९३ रोजी पहिला जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
    शेती सह प्रत्येकाला पाणी हे आत्यंतिक गरजेचे असून पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर करीत इतरांना ही पाणी व्यवस्थापनाचे योग्य ते मार्गदर्शन दिल्यास पाणी टिकवा,पाणी वाचवा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास नक्कीच मदत होईल.या करीता प्रत्येकाने पाण्याचा आवश्यक असलेला व योग्य वापर करतानाच आपल्या परिसरात असणारे पाण्याचे उद्भव विहिरी,बोअरवेल,नदी,नाले यातील पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
    जागतिक जलदिन निमित्ताने सर्वांनी पाणी टिकवा,पाणी वाचवा हा संकल्प करण्याचे आवाहन जलनायक राजेंद्र गदादे यांनी केले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *