शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राम्हण मध्यवर्ती मंडळ : ‘युवाकॉन’तर्फे महिला उद्योजक, स्वयंसिद्धा पुरस्कारांचे वितरण

593

ध्येयनिश्चितीच्या जोरावर यशशिखर गाठता येते – मृणाल जोशी   

पुणे : “आयुष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागते. आपल्यातील कणखरपणा आणि ध्येय निश्चित असेल, तर आपल्याला यशाचे शिखर गाठता येते. पतीच्या निधनानंतर मुलीचा विचार करून व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. आत्मविश्वास आणि सगळ्यांची साथ यामुळे व्यवसायात स्थिरावले आणि विस्तारही करत गेले. त्यामुळे महिलांनी कणखरपणे कठीण परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,” असे मत नायक्रोम इंडियाच्या कार्यकारी संचालिका मृणाल जोशी यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राम्हण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान परिषदेतर्फे (युवाकॉन) जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा आणि युवा उदयोजिका पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्लु मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई नारायण जोशी (अहमदनगर) यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार अक्युपंचर मसाज थेरपिस्ट मानसी कुलकर्णी यांना, तर मनोरमा श्यामराव कुंभोजकर, पुणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युवा उद्योजिका पुरस्कार हर्बीन्जर ग्रुपच्या स्वाती केतकर यांना देण्यात आला.
या महिला उद्योजिकांच्या परिषदेचे उद्घाटन ‘केसरी’ टूर्सच्या झेलम चौबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी शारदा जोशी, संध्या गादो, अमृता देवगावकर आणि दीपा जमदग्नी या उद्योजिकांनाही सन्मानित करण्यात आले. आमदार मेधा कुलकर्णी, केपीआयटीच्या जयदा पंडित, मंडळाचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दि. ना. जोशी, जयंत कुलकर्णी, अजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, धनश्री जोग, प्रतिभा संगमनेरकर, विवेक मेढेकर, राजश्री देशपांडे, दीपा बडवे, मुकुंद वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “महिलांना समाजात कमकुवत असल्याचे दाखविण्यासाठी ‘बांगड्या भरल्यात का’ असे संबोधले जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा. त्यासाठी स्वयंपूर्ण होणे आणि उद्योजक बनणे गरजेचे आहे. महिलांसाठी सरकार विविध योजना आणत असते. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. महिला उद्योजकांमुळे देशाच्या विकासात मोठी भर पडते.”
जयदा पंडित म्हणाल्या, “आपले ध्येय निश्चित असले, तर ध्येयपूर्ती नक्की होते. त्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे, याची खूणगाठ बांधून त्याच्या पूर्ततेसाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे असते. तेव्हा तुम्ही नक्की यशस्वी होत असता.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती नानल आणि अमरजा साठे यांनी केले. आभार मुकुंद वाडेकर यांनी मानले.

– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *