फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनकडून ५०० ‘सेरेब्रल पाल्सी’ ग्रस्तांना मदतीचा हात

342
पुणे : सेरेब्रल पाल्सी या आजाराने देशात अनेक मुले त्रस्त आहेत. अशा मुलांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रिज आणि मुकूल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातारा जिल्ह्यात ही ‘सेरेब्रल पाल्सी’ची मोहीम घरोघरी जाऊन राबविली असून, आजवर ५०० रुग्णांना सेवा दिली आहे.
                      सातारा जिल्ह्यात चार ठिकाणी फाउंडेशनने सेवा केंद्रे उभारली असून, त्यामध्ये सातारा, वाई, पाचगणी आणि पाटण केंद्राचा समावेश आहे. या केंद्रामार्फत ‘सेरेब्रल पाल्सी’ मोहिमेअंतर्गत २७८ मुलांना व्हीलचेअर व कमोडचे वाटप करण्यात आले आहे. पाचगणी केंद्रामार्फत उपचार सुरु असलेली साक्षी घोणे या विद्यार्थिनीने ‘रायटर’ची (सहायक लेखनिक) मदत न घेता नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. ती गेल्या तीन वर्षांपासून या सेवा पुनर्वसन केंद्रावर (रिहॅबिलिटेशन सेंटर) येते. आता तिच्या हातांची योग्य प्रकारे हालचाल होत आहे. स्वतःची व्हीलचेअर ती स्वतः ढकलू शकते. तिच्यामधील हा बदल इतर ‘सेरेब्रल पाल्सी’ आजाराने पीडित मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
                     या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मुकूल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, भारती विद्यापीठ  रुग्णालय, ससून रुग्णालय, संचेती रुग्णालय, केईम रुग्णालय येथील डॉॅक्टर्स विशेष प्रयत्न करीत आहेत.
                    काही कारणाने ‘सेरेब्रल पाल्सी’सारखा गंभीर आजार जडतो. परिणामी, या आजाराच्या रुग्णांना दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे जगणे काही प्रमाणात का होईना सुकर व्हावे, या उद्देशाने २०१५ पासून साताऱ्यात ही मोहीम राबवली जात आहे. ५०० रुग्णांच्या आयुष्यात आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून आनंदाचे क्षण भरू शकलो, याचा आनंद वाटत असल्याचे रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
सेरेब्रल पाल्सी’ आजार होण्याची कारणे
प्रसूतीवेळी मातेला झालेला संसर्ग, काही औषधांचे सेवन, गंभीर जखमा ही प्राथमिक कारणे असू शकतात. त्याचबरोबर मुदतीआधी जन्मलेले अपत्य, जन्माच्या वेळी वजन कमी असणे, मूल उशिरा रडणे, जन्मताना झालेल्या जखमा, एकावेळी अनेक मुलांचा जन्मही ‘सेरेब्रल पाल्सी’ची करणे असू शकतात. काविळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे यामुळेही ‘सेरेब्रल पाल्सी’ होऊ शकतो.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *