टाकळी हाजी,शिरूर : कुकडी पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनावर दिलीप वळसे पाटील यांचे ताशेरे, शिरूर मधील ५० गावांचा पाणीप्रश्न गंभीर,कुकडीतून म्हसे बुद्रुक पर्यंत पाणी सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

899
          टाकळी हाजी,शिरूर (सतीश भाकरे ) :  पुणे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आज दि. २७ ला झालेल्या बैठकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील कुकडी पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढत कुकडी नदीवरील  शिरुर तालूक्यातील ५० पेक्षा अधिक गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनल्याने कुकडी नदीला शिरुर तालूक्यातील म्हसे बु पर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या पाण्याच्या आवार्तनाने या भागातील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
           शिरूरच्या पश्चिम  भागातील कुकडी नदीला गेल्या  दोन महिन्यापासून पाणी नसल्याने या भागातील जनावरांचा चारा,फळबागा तसेच ऊसपिके जळून खाक झाली आहे. ७२ च्या दुष्काळापेक्षाही भयानक दुष्काळ पडल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. परिसरातील विहरी  कोरड्या ठणठणीत पडल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर झाली आहे.जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी व चारा  नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत .हा  सर्व गंभीर प्रकार शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या भागाचे लोकप्रतिनिधी व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडला.त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आज तात्काळ पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची त्वरीत भेट घेऊन या भागातील दुष्काळचे गांभीर्य सांगितले .तसेच या भागातील जळालेल्या डाळिंब बागा व ऊस तसेच ईतर पिकांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन देवून चर्चा केली.तसेच पाटबंधारे विभागाने कुकडी व घोडनदीला पाणी सोडण्याचे ढिसाळ नियोजन केल्याने नाराजी व्यक्त केली.शिरुर तालूक्यातील जाबुंत ,सरदवाडी वडनेर ,माळवाडी ,होणेवाडी ,शिनगरवाडी ,व म्हसे बुद्रुक या भागातील सर्व पिके जळाल्याने य भागात अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने कुकडी नदीला पाणी सोडून या भागातील पाणीटंचाई दूर करण्यास पाटबंधारे विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी वळसे पाटील यांनी यावेळी केली.
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मागणीप्रमाणे टाकळी हाजी भागात म्हसे बु येथे भीमाशंकर कारखान्यामार्फत व निमगाव दुडे येथे पराग ॲग्रोमार्फत चारा छावण्या सुरु करण्यात येणार असून या भागातील जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटणार आहे.
– आ.दिलीपराव वळसे पाटील,माजी अध्यक्ष विधानसभा 
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या चालू करण्याचे आदेश दिले असले तरी संबंधित संस्थेला चारा छावणी चालू करण्यासाठी लागणारे नियम व त्यासाठी लागणारी कागदपञे व विविध खात्यांची मान्यता घेणे किचकट असल्याने चार छावणीसाठी लागणारे नियम शिथिल करण्याची मागणी दिलिप वळसे पाटील यांनी केली आहे.
यावेळी शिरुर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर माजी सरपंच बाळकृष्ण कड ,चांदा गावडे,बबन गाजरे,पोपट सापते ,रोहिदास शिंदे ,सिताराम म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
– विशेष प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *