शिक्रापूर,पुणे : मालकाने पैसे द्यायला सांगितल्याचा बहाणा करून शिक्रापुरात दोन अज्ञात व्यक्ती एकाकडून दोन लाख रुपये घेऊन फरार

473

         शिक्रापूर,पुणे : शिक्रापूर ता. शिरूर येथे ट्रान्सपोर्ट मध्ये नोकरी करणारा इसम बँकेतून मालकाचे पैसे काढून नेण्यासाठी आला असताना त्याला तुझ्या मालकाशी माझे बोलणे झालेले आहे. माझेकडील चेक तुझ्या मालकाला दे आणि तुझ्याकडील दोन लाख रुपये मला दे म्हणून फसवणूक करून दोन लाख रुपये घेऊन अज्ञात व्यक्तीने पोबारा केला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

           याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती व फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील रामदास मोरे यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये क्लार्क म्हणून नोकरी करणारे नवनाथ कारंडे हे शिक्रापूर येथील एक्सिस बँक येथे मालकाच्या खात्यातील दोन लाख रुपये काढून घेण्यासाठी आले.  त्यांनतर बँकेतील दोन लाख रुपये काढून घेऊन जात असताना पाठीमागून एक अनोळखी इसम आला त्याने तुझ्या मालकाला हा बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक देऊन टाक असे सांगितले.त्यांनतर कारंडे हे चेक व पैसे घेऊन जात असताना पुन्हा सदर अनोळखी इसम त्या ठिकाणी आला आणि त्याने तुझ्या मालकाशी माझे बोलणे झालेले आहे, तू बँकेतून काढलेले दोन लाख रुपये मला दे तुला खात्री नसेल तर समोरील बजाज फायनान्समध्ये जा येथील मॅडम तुला पाच लाख रुपये देतील असे सांगितले. कारंडे यांचेकडील दोन लाख रुपये घेऊन सादर इसम शिरूर बाजूने निघून गेला. त्यांनतर कारंडे यांनी समोरील बजाज फायनान्समध्ये जाऊन पाहिले असता तेथे कोणीही नव्हते.त्यांनतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बाहेर देखील कोणी नसल्याने त्याची फसवणूक झाली असल्याचे त्याचे निदर्शनास आले. याबाबत नवनाथ विष्णू कारंडे रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ राहणार काडी वडगाव ता. वडवणी जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हावलदार बनकर हे करत आहेत .

– प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *