निमगाव दुडे,शिरूर : बिबट्याचा शेतकरी दांपत्यावर हल्ल्याचा प्रयत्न,शिरूरच्या निमगाव दुडे येथील घटना

1407
       निमगाव दुडे,शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची दहशत कायम असून आज बुधवार दि. ०३ ला सकाळी साडे दहाच्या सुमारास निमगाव निमगाव दुडे येथील शेतकरी  नवनाथ गोरक्षनाथ चौधरी पत्नी शोभा चौधरी आपल्या शेतात जनावरांसाठीचा चारा (कडवळ) कापत असताना अचानक बाजूकडील शेतातून गुरगुरत आलेला बिबट्या चौधरी पती- पत्नीवर हल्ला कारण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या दोघांनी आपल्या हातातील गवत कापायचे विळखे त्याच्यावर उगारत आरडा- ओरडा केल्याने बिबट्याने बाजूकडील रामदास चौधरी यांच्या शेतात धूम ठोकली. बिबट्याच्या अचानक हल्ल्याने चौधरी पती-पत्नीवर काळ होता पण या घटनेत कुठली ही इजा न होता ते थोडक्यात बचावलेत.
      बिबट्याने अचानक हल्ला केल्याचा प्रयत्न धाडसाने परतवून लावणाऱ्या चौधरी पती-पत्नीने तातडीने गावातील ग्रामस्थांना याची फोनवरून माहिती देत मदतीसाठी बोलावून घेतले. आमदाबाद -निमगाव दुडे नजीकच्या शेवगेमळा,दत्तनगर मधील रामदास भोरडे, मंगेश पानगे, शुभम चौधरी, गोरक्षनाथ चौधरी, पांडुरंग चौधरी भिकाजी चौधरी, शोभा चौधरी, परुबाई चौधरी, अखंड चौधरी, रुपाली चौधरी, रेशमा चौधरी या ग्रामस्थांनी चौधरी यांच्या शेतात धाव घेत काठ्या व गोफणींचा आवाज काढत बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
         घटनेची माहिती शिरूर वनविभागाच्या वनपाल सी ए काटे यांना कळवताच त्यांनी तात्काळ वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांना निमगाव दुडे येथे पाठवत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.कारकूड यांनी लागेचचच घटनास्थळी दाखल होत स्थानिक ग्रामस्थ अर्जुन चौधरी,बबन पानगे व ग्रामस्थांच्या  बिबट्याच्या बंदोबस्तासाठी याठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी वरिष्ठांना कळवली. त्यांनी ही आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पिंजरा लावणार असल्याचे सांगितले.
         प्रचंड दुष्काळात उसाचे क्षेत्र फारच कमी झाले असले तरी अद्याप ही या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. बिबट्याच्या दर्शनाने चौधरी पती-पत्नी खुपच घाबरले असून परिसरातील नागरिक ही अत्यंत भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *