कवठे येमाईत चोरट्यांची दहशत कायम, इचकेवाडीतील कासूबाई गावडे या ७५ वर्षीय वृद्धेच्या घरी घरफोडी, सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस  

881
           कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चोरटयांचा सुळसुळाट कायम असून आज शनिवार दि. ९ ला पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा घरफोडीचा प्रकार घडलाय. इचकेवाडीतील गावडे वस्तीत राहणा-या कासुबाई नानाभाऊ गावडे या ७५ वर्षीय आजी पहाटे १ च्या दरम्यान लघुशंकेसाठी घराबाहेर येण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी दरवाजा उघडताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या ३ अज्ञात चोरटयांनी या आजींना घरातील लाकडी बेडवर ढकलीत गळ्यातील २ तोळ्याची बोरमाळ व कानातील अर्धा तोळ्याचे २ कर्णफुले ओरबाडून काढले.तत्पूर्वी घरासमोर लावलेला विजेचा दिवा काढून घराच्या कोपऱ्यावर प्लास्टिक कॅन वरन घराच्या कौलांवर चढून आत शिरण्याचा चोरटयांचा प्रयत्न आतून फळ्या मारलेल्या असल्याने फसला.
        तर पुढील दरवाजातून आत आलेल्या चोरटयांनी कासुबाई या त्या घरात एकट्याच असल्याचे पाहून त्यांना चाकू दाखवत गप्प बसण्यास सांगितले. दरम्यान चोरटयांनी घरातील कपात व इतर साहित्याची उचकापाचक करीत साहित्य अस्तव्यस्त केले. कासुबाई यांनी घरात ठेवलेली २७०० रुपयांची रक्कम व मोबाईल लांबवला. या घटनेत गावडे यांची दागिने व रोख रकमेसह सुमारे ७० हजार रुपयांची चोरी झाल्याचे आजींचा मुलगा शिवाजी गावडे यांनी सांगितले. घटनेची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलीस घटनास्थळी पाठविले. पोलीस हवालदार एस बी रुपनवर यांनी सकाळी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेत पंचानामा केला. कासुबाई यांचा मुलगा शिवाजी गावडे हे नोकरी निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असल्याने घटनेची माहिती समजताच ते आज सकाळीच घरी पोहचले. पोलीस पाटील गणेश पवार,राजू शिंदे,नारायण गावडे व महिला,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कासुबाई यांच्या कानातील कर्णफुले चोरटयांनी ओरबाडल्याने त्यांना कानाला जखम झाली असून लाकडी बेडवर ढकलल्याने त्यांना पाठ,गुढग्यास देखील मार लागल्याचे कासुबाई यांनी सांगितले. घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी आजींना सकाळीच तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार केले. कासुबाई गावडे यांचे घर एकांतात असून आज पहाटे त्यांच्या घरात चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *