खामुंडी ता. जुन्नर : येथील बैलगाडा शर्यतप्रेमी वधूच्या पालकांनी केलेली लक्षवेधी सजावट.

खामुंडीत लग्नात चारचाकीवर बैलगाडा शर्यतप्रेमींची लक्षवेधी सजावट

1304
           पिंपरी पेंढार,जुन्नर :  (रिपोर्ट,अशोक डेरे) – गेल्या काही वर्षांपासून शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आहे. मात्र बैलगाडा शर्यतींचा नादच खुळा या धर्तीवर नवरी मुलीला मिरवणाऱ्या चारचाकी गाडीच्या बोनेटवर हुबेहूब बैलगाडा शर्यतींची अंत्यत देखणी व आकर्षक सजावटीची मांडणी करून उत्तर पुणे जिल्ह्यातील तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींचे आकर्षण व अनेक जणांचे व्यवसाय अवलंबून असणाऱ्या गावोगावच्या यात्रेत मुख्य आकर्षण व यात्रेला शोभा आणणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात हा परखड संदेश शासनाला पोहचवला आहे.
             जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावरील एका कार्यालयात खामुंडी येथील नवरी मुलीच्या लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवरीमुलीचे ज्या गाडीतून आगमन होणार होते ती गाडी आकर्षक फुले व पानांनी सजविण्यात आली होती. मात्र गाडीच्या बोनेटवर राज्यभरात ग्रामीण भागात अल्प कालावधीत वेड लावलेल्या बैलगाडा शर्यतींची केलेली हुबेहूब मांडणी सर्व वऱ्हाडी मंडळींचे खास आकर्षण ठरली. गाडीवर करण्यात आलेल्या लक्षवेधी आगळ्यावेगळ्या सजावटीकडे ये – जा करणारे पाहुणे मंडळी कुतूहलाने पहात होते. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील की नाही या विषयी रंगतदार चर्चा करताना निदर्शनास येत होती.
             काही वर्षांपूर्वी प्रामुख्याने शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर व नंतर सर्वत्रच बैलगाडा शर्यती यात्रा-जत्रा मधून आपणास पाहायला मिळत होत्या. बैलगाडा शर्यती आहेत म्हणून यात्रा असलेल्या गावात अनेक जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावत असत. मोठ्या संख्येने जमा झालेल्या यात्रेकरूमुळे व गर्दीमुळे त्या गावच्या परिसरातील तसेच यात्रा स्थळावर छोट्या छोट्या व्यावसायिकांना धंदा होऊन मोठे आनंदी वातावरण तयार व्हायचे. ग्रामीण भागात एखादंदुसरा अपवाद वगळता प्रत्येक बळीराजाच्या घरासमोर अंत्यत देखणे घाटाचा राजा असलेले बैल बांधलेले निदर्शनास यायचे. बैल घरी आहेत म्हणून बैलमालकही शक्यतो बाहेरगावी जाणे टाळत असे.  त्यातून शर्यतीच्या बैलांप्रती असलेली माया, ममता, जिव्हाळा याचे आपसूकच दर्शन घडायचे. त्यांची बडदास्त ठेवताना मोठी काळजी घेतली जायची. उत्तमातील उत्तम खुराक, त्यांची आंघोळ, सजावट यात बराच वेळ शेतकऱ्यांचा  खर्च व्हायचा मात्र शर्यत जिंकून आपल्या मालकाचा नाव लौकिक जिल्हापार करणाऱ्या सर्जा राजाची बैल जोडी शर्यतबंदी झाल्यापासून कुठेही  नजरेस पडायला तयार नाही. परिणामी सर्जा राजाची घाटात शर्यतीसाठी पळणारी प्रतिकृतीची मांडणी करणे या व्यतिरिक्त आज बैलगाडा प्रेमींच्या हातात काहीही उरलेले नाही.
    बैल गाडा शर्यती पुन्हा चालू करू असे निवडणूक प्रचारात ठणकावून सांगणारे निवडणुका संपल्यावर बैलगाडा शर्यतीविषयी गप्प असल्याची चर्चा यावेळी पाहुण्यांमधून सुरु असल्याचे पाहावयास मिळाले. बैल या प्राण्याचे जीवापाड जतन करणाऱ्या व वर्षभरातील कष्टप्रद जीवन थोडे बाजूला सारून शेती कामातून थोडी उसंत मिळावी म्हणून सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीवर अचानक बंदी घालण्यात आल्यामुळे शर्यतप्रेमीमध्ये कमालीची नाराजी पसरली असल्याचेही निदर्शनास येत आहे.
          बैलगाडा शर्यतीबाबत फेरविचार होऊन त्या पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यास सातत्याने अपयश येत असल्यामुळे गाडाप्रेमी नवरीमुलीच्या पालकांनी शर्यतीच्या प्रतिकृतीवरच आज हौस भागविल्याचे चित्र पहायला मिळाले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *