मुरबाड रेल्वे मार्गाचा डी पी आर मंजुरीसाठी नीती आयोगाकडे – खासदार कपील पाटील

26443
       मुरबाड,ठाणे :  (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड रेल्वे चा डी पी आर मंजुरी साठी नीती आयोगाकडे सादर करणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.
त्यामुळे तब्बल पाच दशकांचे कल्याण-मुरबाड रेल्वेचे मुरबाडकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले असून येत्या दोनच दिवसात हा आराखडा नीति आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.या आराखड्यात   २०२३ पर्यंत नियोजित वेळेत रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले
       अनेक वर्षांपासून मुरबाड परिसराच्या विकासासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांच्याकडून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणीनंतर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचे पियूष गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ मार्च रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ते रेल्वेमंत्री गोयल यांच्या संपर्कात आहेत.
       मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (प्लॅनिंग) एस. के. जैन यांच्या कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत जैन यांच्याकडून डीपीआरचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी खासदार कपिल पाटील यांना दोन दिवसांत मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर नीति आयोगाकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रकल्पासाठी ९६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर अशी रेल्वे स्थानके अस्तित्वात असून, उल्हासनगरनंतर कांबा रोड,आपटी,पोटगाव आणि मुरबाड रेल्वेस्थानके तयार करण्यात येणार आहेत.
नीति आयोगाच्या मंजुरीनंतर सविस्तर डिझाइनचे काम केले जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती एस. के. जैन यांनी या बैठकीत दिली. नीति आयोगाकडे डिझाइनच्या कामासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. येत्या २०२३ पर्यंत नियोजनानुसारच कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे असे जैन यांनी स्पष्ट केले. मात्र कल्याण नगर रेल्वे ची मागणी ही गेल्या पन्नास वर्षाची आहे. मात्र काहीच प्रोग्रेस नसल्याने मुरबाड उपनगरी रेल्वे ची मागणी जोर धरत होती. काँग्रेसचे चेतन पवार यांनी मुरबाड तालुक्यातील गावागावात रेल्वे परिषद घेतल्या आहेत. तर मुरबाड करांना रेल्वे आली पाहिजे व ही मागणी आता पूर्ण झालीच पाहिजे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *