इंडियन शुगर मिल्सच्या सहअध्यक्षपदी अंकिता पाटील यांची निवड 

865
       नीरा नरसिंहपूर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – नवी दिल्ली येथिल इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ( इस्मा) या संस्थेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. देशातील साखर उद्योगामध्ये अग्रेसरपणे काम करणारी इस्मा ही महत्वाची संस्था आहे.
                       कु.अंकिता पाटील ह्या ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या देशामधील सर्वात तरुण व एकमेव महिला सदस्या आहेत. कु.अंकिता पाटील या उच्च शिक्षित असून परदेशामध्ये शिक्षण झालेले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तसेच एस.बी.पाटील ग्रुपच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहत आहेत.
              इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा)चे देशातील सहाशे पन्नास हून अधिक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील साखर कारखानदार सदस्य आहेत.या संस्थेची स्थापना सन 1932 मध्ये करण्यात आली.देशातील  सर्वात जुनी औद्योगिक संस्था म्हणून इस्माची ओळख आहे. सध्या इस्माच्या सदस्यांची संख्या भारतात उत्पादित एकूण साखरेच्या सुमारे पन्नास टक्केहुन अधिक आहे.देशातील साखर उत्पादकांचा फायदा आणि हितासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याचे काम ही संस्था करीत आहे. भारत देश हा जगामध्ये साखर उत्पादनात  दुसर्‍या क्रमांकावर आहे.देशातील सहकारी साखर कारखाने आणि ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्मा ही संस्था प्रभावीपणे काम करीत आहे.त्याचप्रमाणे इस्मा नियमितपणे भारतीय साखर उत्पादनाच्या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे कामही प्रभावीपणे देशात करीत आहे.कु.अंकिता पाटील यांचे या निवडीबद्दल राज्यातील  साखर उद्योगातून तसेच इंदापूर तालुक्यातून अभिनंदन कारण्यात येत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *