पिंपळे जगतापला चोरट्यांचा एटीमवर डल्ला – सुमारे २२ लाख रुपये केले लंपास

378

            शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील शिक्रापूर – चाकण रस्त्यावर असलेल्या एटीएमवर चोरटयांनी मोठाच डल्ला मारल्याची घटना घडली असून ते फोडून चोरट्यांनी चक्क २१ लाख ७४ हजार १०० रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

            पिंपळे जगताप जवळील चौफुला परिसरातील आयडीबिआय बँकेचे एटीएम मशीन काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. तर दि. ३ नोव्हेंबर पासून हे एटीएम दुरुस्ती करून पुन्हा सुरु करण्यात आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी आयडीबिआय बँक पिंपळे जगताप शाखेचे व्यवस्थापक रोहन पांडे हे बँकेत आले असताना भगवान शेळके यांनी फोन करून पांडे यांना एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून पैसे चोरून नेले असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, किशोर शिवणकर,संतोष शिंदे, निखील यांसह बँकेचे व्यवस्थापक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही वर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम मशीन लोखंडी गॅस कटरच्या सहाय्याने तोडल्याचे लक्षात आले.

              या एटीएम मधील २१ लाख ७४ हजार १०० रुपये चोरट्यांनी लांबविले असल्याची बाब यावेळी उघड झाली. तर यावेळी पोलिसांनी समोरील एका हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता पहाटे चारच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या आलिशान कार मधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी चोरी केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत आयडीबिआय बँक शाखा पिंपळे जगतापचे व्यवस्थापक रोहन चावडी पांडे वय ३७ वर्षे रा. केसनंद रोड वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *