(प्राचार्य, रामदास थिटे) : दीपावली सण म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, मांगल्याचा आणि सौख्याचा उत्सव होय. प्रथमतः भारतीय संस्कृतीतील या ज्योर्तिमय पर्वाच्या आपणांस पवित्र आणि प्रसन्न शुभेच्छा !
मार्च महिन्यापासून सारे जग आणि आपला देश कोरोना महामारीच्या भयानक संकटाने आणि राज्य पुराच्या महाप्रलयाने खचून गेले आहे . गरीब , कष्टकरी, कामगार, वंचित, उपेक्षित, दुर्बल, मागास समाजाचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. सणाचे चैतन्य आहे मात्र तो साजरा करण्याचा उत्साह अर्थकारणामुळे मावळला आहे. या परिस्थितीत प्रपंच कोलमडले आहेत , आपत्तीने घाला घातला आहे. आर्थिक दारिद्रय आणि मानसिक अशांतता उत्साहाचे उधाण प्रकट करूच शकत नाही. मात्र माणुसकी हरपली नाही. आपण चैतन्य आणि मानवतेचे पुजारी आहोत. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून या घडीला मानवजातीच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसण्याचे कार्य म्हणजे पणतीने – पणती प्रज्वलीत करणे होय. थोडा बालहट्ट बाजूला ठेउया, फटाक्यांचे पैसे सेवाभावी संस्थांना दान करुया, शिक्षणाची तहान लागलेल्या गरीब – वंचित पीढीला जुने मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साधनांची मदत करूया ..तोच खरा प्रकाश आणि तेच खरे चैतन्य ..वर्तमान परिस्थितीत रोषणाईचा झगमगाट आणि प्रदुषणाचे साम्राज्य नजरेस येत आहे. कधी काळी दिव्यांनी व पणत्यांनी उजळून निघणारी दिवाळी आरास कमी होत आहे. आसमंत उजळणाऱ्या दिपमाला, फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज, यापेक्षा पहाटेच्या प्रहरी होणारा काकड – जागर, दिवाळ – पहाट यांचे जयगाण मंत्रमुग्ध करणारे आहे. आई, माई, ताई, अक्का , सौ. यांच्या हाताने तयार झालेला सात्वीक फराळ म्हणजे आनंदाची अनुभूती. आजमितीस तयार मिठाइच्या बाजारपेठा, अजीर्ण होणाऱ्या खाद्य-पदार्थाचे स्टॉल्स संस्कृतीचे निदर्शक नाहीत. येथे मात्र अन्नपूर्णेची आराधना कमी होत चालली आहे.
सनई, चौघडे, संगीत यांचे मंत्रघोष मंत्रमुग्ध करतात मात्र सांयकाळी उमटणारे बेहोश संगीत तरुणाईला भुरळ घालते आहे. संगीताची घराणी अस्तंगत होउन बेधुंद संगीत ऐकावयास लागणे हे सणाचे महात्म्य नव्हेच.. सुगंधी उटणे , सौभाग्याचे अलंकार , स्नेहाची आंघोळ आणि मायेची भाऊबीज ही गुणसंपदा बाजूला पडताना दिसतेय. प्रकाशाचा झगमगाट आणि फटाक्यांचे पाणीपत पर्यावरणाचे प्रदुषण वाढवते आहे. डिओ, सेंट, अत्तरे यांचे फवारे यामुळे सदनातील सुगंध नाहीसा होत आहे. पोकळ प्रतिष्ठा, घरंदाजपणाची ऐट, श्रीमंतीचा तोरा बाजूला ठेवला तर गरीब विद्यार्थी , चौकतला भिक्षेकरी, बाजारातला हमाल फुटपाथवरील शु-पॉलीशवाला, भिक्षेकरी, अनाथ-अपंग, पोस्टमन, वृत्तपत्र विक्रेता, घरकाम काज करणारी महीला अन्य कष्टकऱ्यांच्या जीवनांत सौख्याचे क्षण प्राप्त होतील. माणुसकी आणि सहृदयता या भावनेतून या परिस्थितीचा सन्मान करणेची हीच योग्य वेळ आहे. सुजलाम – सुफलाम भारतात श्रमजीवी आणि स्वावलंबी नागरिकाच्या डोळ्यांतला एक तरी अश्रू पुसण्याचे महान कार्य म्हणजे माणुसकीचा दिपोत्सव .. याप्रसंगी वचितांचे अश्रू पुसणे आणि जीवनांस आनंदाचा बहर प्राप्त करून देणे म्हणजेच प्रकाश , मांगल्य आणि सौख्याच्या क्षणांचे साक्षीदार होणे होय. माणुसकीचा दिप प्रज्वलीत राहणे हीच खरी दिपावली आणि तोच खरा दीपोत्सव ..
– प्राचार्य, रामदास थिटे
सचिव, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, शिरूर
(संकलन : प्रतिनिधी, राजाराम गायकवाड)
–