खाऊसाठी साठविलेल्या पैशातून गोशाळा उभारणीस २१०० रुपयांची मदत – कवठे येमाईत गौरवी शिंदे या चिमुकलीचा वाढदिवशी स्तुत्य उपक्रम 

674

       शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – वाढदिवस साजरा करायचा म्हटला कि धमाकेदार मेजवानी ठरलेलीच. परंतु त्याला काही अपवाद पाहावयास मिळतात. वाढदिवशी होणारा नाहक  खर्च टाळून सामाजिक व विधायक उपक्रमांना मदत देणारे अनेक जण आहेत. कवठे येमाईत सध्या श्री फत्तेश्वर गोशाळा उभारणीचे काम सुरु आहे. आणि हेच औचित्य साधत व लहानपणापासून गोमातेविषयी असणारे प्रेम,माया व ममता.आवड लक्षात घेत येथील गौरवी नितीन शिंदे या चिमुकलीने आपला वाढदिवस नव्याने उभारण्यात येत असलेल्या गोशाळेत साजरा करण्याचे व गोशाळेस खाऊसाठी साठविलेल्या पैशातून २१०० रुपये मदत देण्याची संकल्पना मांडली.

इतक्या कोवळ्या वयात आपल्या मुलीकडे असलेली सामाजिक बांधिलकीची जाण पाहून आई वडिलांनी तात्काळ निर्णय घेत आपल्या मुलीचा वाढदिवस थेट गोशाळा परिसरात साजरा करून गोशाळेस शिंदे कुटुंबियांकडून आर्थिक मदतीचा हात दिला. गावातील श्री येमाई व श्री मळगंगा देवीस भाविकांकडून अर्पण करण्यात येत असलेल्या खिल्लार (देशी) गायांचे जातं करण्यासाठी व त्यांना हक्काचा निवारा व्हावा या हेतूने संस्थापक अध्यक्ष,गोमाताप्रेमी पशुवैद्यक डॉ. कुंडलिक शितोळे व त्यांच्या सहकाऱयांनी सुरु केलेला गोशाळा उभारणीचा संकल्प अनेकांना प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असाच आहे.
गौरवीच्या वाढदिवशी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबाबद्दल उपस्थितांनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन करीत तिला शुभेच्छा दिल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *