कवठे येमाईत बिबट्यांची पुन्हा दहशत 

1582
             शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारमाही बागायती क्षेत्र असलेल्या कवठे येमाई गावात मागील आठवड्यापासून बिबट्याची पुन्हा दहशत सुरु झाली आहे.  बिबट्या पाळीव प्राण्यांना भक्ष करीत असल्याने शेतावर वस्ती करून राहणारे नागरिक धास्तावले आहेत. काल दि. ८ ला येथील राजेंद्र रामभाऊ गावडे यांच्या वस्तीनजीक बिबट्याने दिवसाढवळ्या सायंकाळी ४ च्या सुमारास एका मेंढीवर हल्ला करीत तिला नजीकच्या उसाच्या शेतात घेऊन गेला. जवळच शेतीला पाणी देत असलेले बबन गावडे यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली व भेदरलेल्या अवस्थेत घर गाठले. तर येडे – बोर्हाडेवस्तीवर सायंकाळी ७ च्या दरम्यान गाईची धार काढीत असलेले विशाल गावडे व जवळच असलेले रंगनाथ येडे यांनी गोठ्याच्या मागील बाजूस मोठा बिबट्या असल्याचे पाहिले. त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने बाजूकडील उसाच्या शेतात धूम ठोकली.अशा वारंवार घटना कवठे येमाई शिवारात घडत असून वन विभाग मात्र बिबट्यांच्या बंदोबस्ता संदर्भात ठोस उपाय योजना राबवित नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
          मागील काही दिवसांत बिबटयानी अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. यात घोडी, शेळी,पाळीव कुत्रे यांचे नाहक बळी जात आहेत. एकीकडे कोरोना महामारीचे पुन्हा घोंगावात असलेले संकट तर दुसरीकडे बिबट्याची दहशत व पाळीव पाळीव प्राण्यावर होत असलेले सततचे हल्ले यामुळे नागरिक चांगलेच हादरले आहेत. शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांना याबाबत माहिती दिली असता गावडे यांच्या शेतानजीक तात्काळ पिंजरा लावण्यात येईल असे आश्वासन दिले व वन कर्मचारी लगेचच त्या ठिकाणी भेट देतील असे आश्वासन दिले असताना ही सायंकाळी ५ वाजेपर्यंत वन विभागाचा एक ही अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकला नसल्याचे शेतकरी बबन गावडे व परिसरातील नागरिकांनी सांगितले. बिबट्याच्या सततच्या दर्शनाने शेतावर वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी बिबटयांचा मोठाच धसका घेतला असून रात्री दिसणारे बिबटे आता दिवसाही पाळीव प्राण्यांना भक्ष करू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावडे,येडे,बोऱ्हाडे वस्तीतील ज्ञानेश्वर बोऱ्हाडे,दत्ता येडे,विशाल गावडे,सचिन गावडे,रंगनाथ येडे,बाळासाहेब येडे,दौलत बोऱ्हाडे,बबन राजेंद्र गावडे,सामाजिक कार्यकर्ते विलास रोहिले व शेतकऱ्यांमधून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *