आणि धामण सर्प पायाजवळून माघारी गेला

1811

आणि धामण सर्प पायाजवळून माघारी गेला

शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – वेळ साधारणतः आज दि. ०४ ला सायंकाळच्या ४ ची. शिरूर तालुक्यातले कवठे येमाई येथील जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे आपल्या शेतीजवळील कॅनालच्या रस्त्यावर शेवग्याच्या झाडाच्या सावलीला दुचाकी स्कुटी उभी करून स्कुटीच्या मधल्या जागेवर जमिनीवर पाय सोडून बसलेले. जवळच उभे असलेले शेतकरी आवडा कांदळकर त्यांच्या भुईमूग पिकास पाणी पोहचतेय का ते पहात उभे असलेले. तेवढ्यात पत्रकार शेटे यांना वाटेकरी शेतकऱ्याचा फोन येतो. फोनवर संभाषण सुरु असतानाच अचानक कॅनॉलमधून साधारण ७ ते ८ फूट लांबीचा जाडजूड धामण सर्प पत्रकार शेटे यांच्या दिशेने येतो. दोन्ही पायांच्या मधून पुढे जाण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाला वळसा घालून मागे फिरतो.हाच सर्प सकाळी फ्लॉवर तोडणीसाठी आलेल्या महेश व रुपाली रोहिले या शेतकरी पती पत्नीने पाहिलेला होता.  तर समोरील शेतीकडे पहात फोनवर संभाषण करण्यात मग्न असलेल्या पत्रकार शेटे यांना तरीही त्याची जाणीव झाली नाही. तेवढ्यात जवळच उभे असलेले शेजारचे शेतकरी मित्र आवडा कांदळकर मोठ्याने आवाज देत साप ! साप ! साप ! ओरडत मागे सरकतात. एव्हाना तो भला मोठा पिवळा जर्द धामण सर्प शेटे यांच्या पायाला खेटून वळसा घालून क्षणात कॅनॉलकडे मागे फिरतो व कुठलीही इज़ा न करता बिळात गायब होतो.

शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या भागात पावसाने दडी मारली आहे. थोडीफार उष्णता ही वाढली आहे. साहजिकच सापांसारखे सरपटणारे प्राणी गारव्यासाठी,भक्षासाठी दिवसा ही पाहावयास मिळत आहेत. नाग,घोणस हे विषारी सर्प काही प्रमाणात आपल्या परिसरात पाहावयास मिळतात. पण धामण व इतर बिनविषारी सर्प ही मोठ्या प्रमाणात शेती परिसर,गाववस्ती परिसरात पाहावयास मिळतात. ते त्यांच्या मार्गाने जात असतात. शक्यतो धामण जातीचे सर्प दंश करत नाहीत.पण ते आकाराने व लांबीने मोठे असल्याने आपण घाबरून जातो. पण हेच साप हे शेतकऱ्यांचे मित्र म्हणून संबोधले जातात. तरीही शेतातील कामे करताना शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व काळजी घेत कामे करावीत. आपल्या परिसरात सर्प दिसल्यास जवळच्या सर्प मित्रास पाचारण करा. सापांना जीवनदान द्या. व पुनश्च नैसर्गिक वातावरणात मुक्त संचार करण्यासाठी प्रयत्न करा.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *