संकटांचा सामना करीत कांदा लागवडी सुरु – शिरूर तालुक्यातील चित्र 

461
          शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागासह तालुक्यात अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेली कांदा रोपे आता ढगाळ हवामानाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने शेतकरी लागवडी करताना दिसून येत आहेत. मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कांदा बियाणे वाफा पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी टाकण्यात आली होती. तेव्हा पासून ते आज तागायत सातत्याने बदलत्या हवामानाने कांदा रोपे व या दरम्यान शेतकऱयांनी लावलेल्या कांद्यास मोठाच फटका बसला. महागडी खते,औषधे,फवारणी वारंवार करून जोपासलेले कांदा रोप आता शेतकरी शेतात लागवड करीत आहेत.
           कांदा लागवडीसाठी असलेली मजुरांची टंचाई,लागवडी साठी मजुरी दर जरी वाढलेले असले तरी तालुक्यात अनेक शेतकरी हमाखास उत्पन्न देणारे पीक म्हणून कांदा लागवड करतात. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कवठे येमाई,टाकळी हाजी व परिसरातील गावांतून हमाखास कांदा पीक घेतले जात असल्याची माहिती शेतकरी विलास रोहिले,आवडा कांदळकर,पांडुरंग पवार यांनी दिली.
          कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील शेतकरी विलास रोहिले यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात उन्हाळी गावरान कांद्याची लागवड सुरु केली आहे. शेतीची मशागत,शेणखत व वर खतांची योग्य ती मात्रा  टाकून वाफे तयार करून त्यात पाणी देत तयार कांदा रोपे लागवड करण्यात येत असल्याचे विलास रोहिले यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. हवामानाने साथ दिल्यास एक एकर क्षेत्रातून किमान ७ टन कांदा उत्पन्न हमखास मिळेल अशी आशा त्यांनी व्यस्क्त केली आहे. तर मजुरांची टंचाई लक्षात घेत अनेक ठिकाणी सावड पद्धतीने शेतकरी महिलांच्या मदतीने कांदा रोपे लागवड करण्यात येत असल्याचे सावकार घोडे,रामदास कांदळकर यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *