रक्षाबंधनला हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने बहिणीचा मृत्यू – टाकळी हाजी येथील घटना 

231
शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भाऊ- बहिणीचे अतूट नाते रेशीम धाग्यांनी विणनारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. मात्र या वर्षीचा हा सण एका भावासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी दि.३० ला या  सणाच्या दिवशी सकाळीच टाकळी हाजी ता.शिरूर येथील शशिकला शिवाजी पोकळे,वय ३७ वर्षे या भगिनीला हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
    शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील या विवाहित भगिनीवर काळाने घाला घातला आणि तिच्याबरोबरच भावाच्या स्वप्नांवर पाणी फिरले. रक्षाबंधनासाठी भावाकडे जायचे म्हणून बहिण सकाळी लवकर उठून काम आवरत होती. सकाळी साडेसातच्या सुमारास कपडे धुत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले आणि ती जमिनीवर कोसळली.  तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा उपचारापूर्वीच दुर्दैवी अंत झाला.शशिकला यांची बहीण उचाळेवस्ती येथे त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत आहे. पितृछत्र हरपल्यानंतर आई आणि भाऊ यांच्यासाठी शशिकला चा मोठा आधार होता.
         अतिशय शोकाकुल वातावरणात दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  ऐन तारुण्यात लेक जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा,भाऊ,बहीण,पती,दोन मुले यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणाऱ्या आवाजाने उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला होता.
          शशिकला यांचे पती शिवाजी पोकळे हे टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे चालक आहेत. अनेक रुग्णांना रात्री अपरात्री वेळेत उपचारासाठी घेऊन जाणारा प्रामाणिक कर्मचारी अशी त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्यावरच अशी वेळ ओढवल्याने पंचक्रोशीतील नागरिकांबरोबरच आरोग्य खात्यातील डॉक्टर,कर्मचारी यांच्या मधून हळहळ व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *