सविंदणेच्या पूर्व नरवडे मळा नजीकच्या दोन रोहित्रांवर चोरट्यांचा डल्ला – सार्वजनिक पाणीपुरवठा विस्कळीत 

806
पाबळ,शिरूर : (अमीन मुलाणी,प्रतिनिधी) – शिरूरच्या पश्चिम भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली दिसत असतानाच सविंदणेच्या पूर्व नरवडे मळा नजीकच्या दोन रोहित्रांवर चोरट्यांचा डल्ला मारला. सोमवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पूर्व नरवडे मळा व हाडकी हाडवळा असे दोन विद्युत रोहित फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कर्मचारी व वस्तीवरील नागरिकांनी सकाळी विद्युत रोहित्रांची पाहणी केली.विद्युत रोहीत्र तोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरी झाल्याचे निदर्शनास आले.तर नुकतेच या परिसरातील फटांगडे दरा येथील विद्युत रोहित्र देखील फोडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.या चोरीच्या घटने  बाबत शिरूर पोलीस स्टेशनला ग्रामपंचायत प्रशासनाने लेखीपत्र दिल्याची माहिती सरपंच शुभांगी पडवळ,उपसरपंच भोलेनाथ पडवळ यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
        ‌    सविंदणे हद्दीतील ग्रामपंचायत गावठाण पाणीपुरवठा व कामठेवाडी, डोंगर भाग,पिराचा माळ या ठिकाणी पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरींचे विद्युत कनेक्शन असून त्यांचे ट्रांसफार्मर चोरी झाल्यामुळे गावठाण व इतर वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा,शेतीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. सदर घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हेगारांचा शोध लावून त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरपंच शुभांगी पडवळ यांनी केली आहे. दरम्यान उपसरपंच भोलेनाथ पडवळ, विठ्ठल पडवळ, महेंद्र नरवडे, विजय नरवडे, मुकेश नरवडे यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
दोनच दिवसांपूर्वी मलठण शिंदेमळा येथील मंदिरातील साहित्याची चोरी झाली आहे. चांडोह परिसरातील घोड नदीकिनारी असलेल्या ६ ते ७ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी झाली. बेट भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी चोरीच्या घटना व अनुचित प्रकार रोखण्यासाठी रात्री गस्त वाढवून प्रत्येक गावात सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
                              – अमोल पन्हाळकर – सहायक पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन 
” तालुक्याच्या पश्चिम भागातील बेट भागासह कवठे येमाई,मलठण,सविंदणे परिसरात सध्या सुरु असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी. रात्र गस्तीसाठी पोलीस गाडी या भागात फिरून गस्त घालीत आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सोव सुरु होत आहे.लवकरच या भागात गावागावातून ग्रामसुरक्षा दलाची मदत गस्तीसाठी घेण्यात येणार असून त्याकरिता प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलातील सदस्य व स्थानिक ग्रामस्थ यांचे सोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल व गाव सुरक्षा संदर्भात काय उपाय योजना करता येतील त्या विषयी चर्चा करण्यात येईल.” 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *