वीज रोहित्रे फोडण्याचा फंडा सुरूच – कवठे येमाईत चोरट्यांनी दोन रोहित्रे फोडली 

303

शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईच्या इनामवस्ती,फत्तेश्वर मंदिरानजीकची दोन वीज रोहित्रे अज्ञात चोरटयांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची नुकतीच घटना घडली. मागील एकाच आठवड्यात ट्रान्स्फार्मर फोडण्याच्या दोन घटना घडल्याने परिसरात पाणी असून विजेच्या खोळंब्यामुळे शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. तर या चोरांना पकडण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर पोलीसांकडून करण्यात आले आहे. तसेच रोहित्र असलेल्या परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा वाहन संशयास्पद रित्या आढळुन आल्यास त्याची चौकशी करून संशयास्पद वाटल्यास स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सध्या पश्चिम पट्ट्यात, कवठे येमाई परिसरात कांदा लागवड चालू असल्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. पाणी असूनही ट्रान्स्फार्मर अभावी वीज नसल्याने त्याचा उपयोग शेतकऱ्यांना करता येत नाही. काही महिन्यांपासून सुरु झालेले हे चोरीचे सत्र अद्यापही थांबायला तयार नाही. वीज मंडळाकडून नवीन विद्युत रोहित्र आणणे म्हणजे खूप कठीण काम, शेतकऱ्यांना मोठे दिव्य पार करावे लागते, अशा वेळी शेतकरी वर्गाला लोकप्रतिनिधी, महावितरण अधिकारी, कर्मचारी यांचे उंबरठे झिजवावे लागतात. तसेच तेथील सर्वांची वीज बिलांची वसुली झालेली असेल, तरच प्राधान्य क्रमाने नविन रोहित्र मिळते. गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या टोळीतील चोरांना शोधण्यासाठी पोलीस कसून काम करत आहेत मात्र धागादोरा लागत नसल्याने टोळीचे मनोबल वाढल्याची खंत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
या टोळीमध्ये एखाद्या स्थानिक चोराचा समावेशअसण्याची किंवा टोळीतील लोकांना परिसराची खडान खडा माहिती असावी असा अंदाज शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. पोलिसांनी या ट्रान्स्फार्मर फोडणाऱ्या चोरट्यांचा लवकर बंदोबस्त केला नाही तर याबाबत शेतकरी मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *