कवठे येथील श्री येमाई देवी यात्रा उत्साहात सुरु – गावात हनुमान जयंती ही आनंदात साजरी  

237
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – अखंड महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणारे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील जागृत देवस्थान,तीर्थक्षेत्र श्री यमाई देवीचा चैत्र पौर्णिमेस होणारा यात्रोत्सव व हनुमान जयंती उत्सवास आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली.  भाविकांनी हनुमान जन्मोत्सव व श्री येमाई देवीच्या पालखी सोहळ्यास मोठीच गर्दी केली होती. 
  सध्या तालुक्यातील विविध गावोगावच्या यात्रा,जत्रा धुमधडाक्यात सुरु असल्याने छोट्या,मोठ्या व्यावसायिकांना उभारी मिळण्यास दिलासा मिळू लागला आहे.आज दि.२३ ला चैत्र पौर्णिमा व श्री हनुमान जयंती कवठे येमाई गावठाणातील ऐतिहासिक हनुमान मंदिरात जन्मोत्सव उत्साहात व आनंदात संपन्न झाला.यावेळी भजन आयोजित करण्यात आले होते. 
         तर ग्रामदैवत श्री येमाई देवीचा पालखी सोहळा सकाळी आठ वाजता मोठ्या जल्लोषात सुरु झाला.देवीच्या पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखी समोर आकर्षक झांज पथक वाद्य आयोजित करण्यात आले होते. तर गावातील कलाकार पारंपारिक सनई,संबळ,ताशा,डफ यांसह सहभागी झाले होते. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच दीपक रत्नपारखी व सहकाऱ्यांनी यांनी पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांसाठी थंडगार मट्ठा उपलब्ध केला होता.  
           गावापासून ३ किमी अंतरावर श्री येमाई देवीचे भव्य मंदिर आहे. आज व उद्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती,तमाशा,व कुस्त्यांचा जंगी आखाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती गावच्या सरपंच शोभा किसान हिलाळ,यात्रा कमेटी, व समस्त ग्रामस्थांनी दिली. तर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे व यात्रा उत्साहात पार पडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, ग्रामपंचायत प्रशासन सरपंच/उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,श्री यमाई देवी यात्रा कमिटी, तंटामुक्ती समिती,छबीना मंडळ,व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.शिरूर पोलिसांच्या वतीने यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *