शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुचर्चित शिरुर मतदार संघाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातल्याने ही निवडणुक चुरशीची होणार असेच चित्र निर्माण झाले होते. टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटात डॉ अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे आणि कवठे येमाई पंचायत समिती गणाचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सावित्रा थोरात यांनी कंबर कसली होती.शिरूर बरोबरच तालुक्यातील टाकळी हाजी येथे शिवाजी आढळराव यांच्यासाठी अजित पवार यांची सभा घेण्यात आलीहोती.या सभेतही पवार यांनी त्यांच्या स्टाईलने कोल्हे यांना निवडूनच कसा येतो असा सज्जड इशारा दिला होता. महायुतीचे तिन्ही पक्षांचे दिग्गज या निवडणुकीत एकत्रित येवून आढळराव यांना मत म्हणजे मोदींना मत असा जोरदार प्रचार करत होते.
हा जिल्हा परिषद गट ग्रामीण भागातील शेतीप्रधान असल्याने शेतकऱ्यांच्या मनात मात्र मोदींविषयी नाराजी तर शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूतीची लाट होती. टाकळी हाजीचे माजी सरपंच, शरदचंद्र पवार गटाचे दामूअण्णा घोडे यांनी तळागाळात पोहोचत कोल्हे यांच्या पेक्षा शरद पवार यांच्यासाठी मतदानाचे आवाहन केले आणि याचाच फायदा कोल्हे यांना झाला.त्यामुळेच दामुअण्णा घोडे यांचे या गटात निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्हीही पक्षांचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे आणि सावित्रा थोरात हे टाकळी हाजी गावातील आहेत मात्र ते स्वतःच्या गावातून आढळराव यांना मताधिक्य देवू शकले नाहीत. तसेच शिंदे गटाचे नेते डॉ.सुभाष पोकळे यांच्या गावातूनही कोल्हे यांना च मताधिक्य मिळाले.जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले महायुतीतील राजेंद्र गावडे,सावित्रा थोरात,डॉ. सुभाष पोकळे हे तिघेही एकत्र असताना ते आढळराव यांना मताधिक्य देवू शकले नाहीत.मात्र महाविकास आघाडीचा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेला एकमेव चेहरा दामूअण्णा घोडे हे मात्र जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार ठरले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांना घोडे यांनी लोकसभेला मिळवून दिलेले साडेसात हजारांचे मताधिक्य त्यांच्या राजकीय भविष्याचा आलेख उंचावणार याची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.