समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा रोजचा संचार वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या अगदी दररोज गावठाणात प्रवेश करत असल्याने भीती वाढली असून बिबट्यांच्या धास्तीने रात्री सातलाच गावात स्मशान शांतता पसरत आहे. दरम्यान शिरूर वन विभागामार्फत आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मारुती मंदिरा च्या मागील बाजूस पिंजरा बसविण्यात आला. या वेळी वन विभागाचे हनुमंत कारकूड,त्यांचे सहकारी शहाजी बारहाते आपदा मित्र,सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफणा, पांडुरंग भोर,रितेश शहा,प्रशांत बंटी सांगडे,अजित शिंदे,अमोल पंचरास,अक्षय शिंदे,गणेश दळवी, भैय्या पठाण,राकेश ढाकणे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भक्ष म्हणून ४ कोबंड्या ठेवण्यात आल्या.

सध्या बिबटे कुत्र्यांवर हल्ले करीत आहेत न जाणो केव्हाही माणसांवरही हल्ला होऊ शकतो अशी भीती आता पेठेतील नागरिक व्यक्त करत आहेत. बिबट्याच्या धास्तीने रात्री एकट्याने बाहेर पडणे कठीण झाले असून अनेक नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे ज्या गावठाणातील मुख्य बाजारपेठेत दररोज ग्राहकांची मोठी वर्दळ असते, त्याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास बिबट्या निर्धास्तपणे फिरताना दिसत असल्याने ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.पहिली घटना महादेव मंदिरालगत घडली, जिथे बिबट्याने कुत्र्याला ठार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुतार आळीतही कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडण्यात आला. काही कुत्र्यांची पिल्ले व गायीच्या काळपावर ही बिबट्यांचा हल्ला झाल्याची चर्चा ग्रामस्थ करीत असताना दिसत आहेत. या सलग घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने ऊसतोड झालेल्या शेतांमुळे उसामध्ये आसरा करणारा बिबट्या सैरभैर झाला असून भक्षाच्या शोधात गावाकडे येत असल्याचे दिसून येत आहे.बिबट्या पकडण्यासाठी विशेष पथक व आवश्यक यंत्रणेचा अभाव असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. थेट गावठाणात बिबट्याचा संचार सुरू झाल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. पूर्वी जंगलात संचार करणारे बिबटे उसक्षेत्रात दाखल झाले. तेथील वातावरण मानवले, त्यामुळे त्यांची संख्या वाढली; मात्र अन्नाची कमतरता निर्माण झाल्याने त्यांनी गावांकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे.कवठे गावठाणात कुत्र्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वनखात्याने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी सरपंच मनीषा पांडुरंग भोर व गावठाण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान वन कर्मचारी हनुमंत कारकूड तातडीने दाखल झाले असून सामाजिकर्ते पांडुरंग भोर,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आजच गावठाणात पिंजरा लावण्यात आला.



