ठाणे जिल्ह्यातील ओला दुष्काळ – भरपाई मिळण्यासाठी आता गरज समन्वयाची  

486
         मुरबाड,ठाणे : ( प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे.  जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
          सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोमवार पर्यंत तालुक्यातील शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत अशी माहिती मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली. 30 ऑक्टोबरला मुरबाड पंचायत समिती व तहसील कार्यालयाने  तलाठी, ग्रामसेवक,कृषी अधिकारी यांची बैठक घेतली व 31 ऑक्टोबर पासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.
         मुरबाड तालुक्यातील खरीप हंगामात लागवड केलेल्या 14  हजार हेक्टर क्षेत्रातील भात पिकांपैकी जवळपास 100 टक्के नुकसान झाले आहे.  मुुुरबाड तालुक्यात एकूण 209 महसुली गावे व अनेक वाड्या, पाडे आहेत.
          एका बाजूला शासनाच्या आदेशानुसार शासकीय नुकसान भरपाई साठी पंचनामे तर दुसऱ्या बाजूला पिक विमा योजने अंतर्गत पंचनामे करून त्याचे फॉर्म विमा कंपनीस विहित मुदतीत पाठवणे असा दुहेरी कामाचा बोजा आहे व तो बोजा महसूल विभाग,पंचायत समिती व कृषी विभाग अशा तीन स्वतंत्र यंत्रणामधील कर्मचारी सांभाळणार असल्याची माहिती मिळाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *