भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आमरण उपोषण –  शिरूरच्या जांबुत येथील घरकुल घोटाळा प्रकरण

390
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जांबुत येथील घरकुल घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शिरूरला आमरण उपोषण करण्याचा इशारा संबधीत विभागांना लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे. घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी जांबुत येथील लाभार्थी रणदिवे कुटुंबियांनी शिरूर तहसील कार्यालयात जून महिन्यात सुरु केलेले आमरण उपोषण गट विकास अधिकाऱ्यांच्या १० दिवसात कारवाई करण्याच्या लेखी आश्वासना नंतर   दिनांक २५ जूनला रणदिवे कुटुंबियांनी उपोषण स्थगित केल्यानंतर गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट घेऊन रणदिवे कुटुंबीयांना न्याय मिळणेबाबत घरकुलाच्या विषयास कार्यवाही करणे कामी १० दिवसाच्याआत चौकशीचे काम पुर्ण करण्यात येईल व दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे रणदिवे कुटुंबीयांना दिलेल्या पत्रात आश्वासन दिले होते. मग मागील चार महिन्यात कारवाई बाबत गटविकास अधिकारी महेश डोके यांनी अद्याप ही कुठले च ठोस पाऊल का उचलले नाही ? गटविकास अधिकारी कोणाची तरी पाठराखण तर करत नाही ना ? अशी जांबुत परिसरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
शिरूर तालुक्यातील जांबुत मध्ये घरकुल घोटाळा प्रकरणातील पीडित मागासवर्गीय कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पिडीत कुटुंबीयांना न्याय द्यावा या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी मागील वर्षभरापासून निरंतर पाठपुरावा करत आहे. पंचायत समिती शिरूरचे गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी च्या अहवालात अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही अतिशय संतापजनक आणि निंदनीय बाब आहे. या अन्यायाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागर घोलप यांनी ७ ऑक्टोबर २४ पासून शिरूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत आणि शासकीय कामात अनियमितता व भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महेश डोके – गट विकास अधिकारी,पं. स.शिरूर 
– जांबुत ता.शिरूर येथील तत्कालीन घरकुल घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली असून हा विषय आता जिल्हा परिषदेच्या पातळीवर असल्याने यात दोषी असणारांवर योग्य ती कारवाई कारण्यासंदर्भात जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
तर उपोषण आंदोलन करून सदर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्रचे अमोल भाऊ लोंढे, तसेच महिला आघाडीचे प्रधान महासचिव सुनिता ताई कसबे,राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे ,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, भारतीय बहुजन पालक संघ,मुलनिवासी महिला संघ आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते समर्थन मिळत आहे.जांबुत येथील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds