समाजशील न्यूज : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभा निवणुकीपूर्वी मुरबाड मधील राजकारण तापले असून भाजपने मुरबाड विधानसभेची उमेदवारी विद्यमान आमदार किसन कथोरे यांना जाहीर केल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष पवार यांनी धनुष्य बाणाला सोडून तुतारी हातात घेतली आहे. त्यामूळे मुरबाड विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बदल घडवल्याने विधान सभेतही बदल घडला पाहिजे अशी मतदारांची खाजगीत चर्चा ऐकायला मिळत आहे. लोकसभेतील बदल हा भाजप मधील अंतर्गत वादामुळे झाला असल्याचे स्पष्ट असल्याने या वादाचा परिणाम विधानसभेत दिसणार आहे. माजी खासदार कपिल पाटील यांचे खंदे समर्थक माजी जिल्हाध्यक्ष मधूकर मोहपे यांना पदावरून हटविण्याने पक्षात आणखी नाराजी वाढली असून, कपिल पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा घेऊन लोकसभेचा बदला घेण्याची भाषा बोलून दाखवली होती. सुभाष पवार यांनी मुरबाड विधानसभा कुठल्याही परिस्थितीत लढवायचे असे जाहीर केल्यापासून ते तुतारी हातात घेणार असे बोलले जात होतें. त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतर सुभाष पवार यांचा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश स्थगित केला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुरबाड विधानसभेसाठी आग्रही असतानाही भाजपने हि जागा न सोडल्याने अखेर सुभाष पवार यांनी तुतारी हाती घेतली आहे. मागील काळात माजी आमदार गोटीराम पवार यांचे तिकिट कापून किसन कथोरे यांनी पवारांची सत्ता उलटवली होती. त्यामूळे त्याचा राजकिय बदला घेण्याची वेळ आल्याची भावना कार्यकर्ते जाहीर बोलत असताना मुरबाड विधानसभेचा आमदार हा स्थानिक असावा असे बोलले जात आहे. त्यामूळे स्थानिक व दुसऱ्या शहरातला असा वाद वाढत असताना महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपा तील नाराज गट महाविकास आघाडीच्या माध्यमातुन विद्यमान आमदार किसन कथोरे यांची विजयी रथ रोखण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. एकतर्फी वाटणारी मुरबाड विधानसभा यंदा रंगतदार ठरणार आहे. त्यामूळे पुन्हा एकदा विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या सह माजी खासदार कपिल पाटिल, माजी आमदार गोटीराम, पवार, नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या सह सुभाष पवार यांची राजकीय ताकद पहायला मिळणार आहे. मात्र आज यशवांत राव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोटीराम पवार, सुभाष पवार यांच्या सह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत तुतारी हातात घेतली आहे.