शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय नगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार आज रविवार दि. १३ व उद्या सोमवार दि. १४ असे दोन दिवस शिरूर तालुक्यातील कवठे परिसरातील भीमाशंकर साखर कारखान्यास मागील हंगामात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांस सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने येथील श्री बालाजी मंगल कार्यालयात साखर वाटप करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.

सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले असून नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येत असून कवठे गावात २० रुपये प्रति किलो दराने ५०,२७० किलोचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या कवठे कार्यालयाकडून देण्यात आली. सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२३- २४ मध्ये ज्यांनी ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहणार आहे. त्यामध्ये (१) पुर्ण भागधारक (रु. १०,०००/-) व ऊस उत्पादक- ८० किलो (२) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक- ६० किलो (३) अपुर्ण भागधारक व ऊस नाही – ५० किलो याप्रमाणे तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०.२० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.साखर घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडून मागील वर्षी देण्यात आलेले स्मार्ट कार्ड घेऊनच येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.