कारेगाव येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

28

पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : जगभरात ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करणारा आणि लैंगिक समानतेचा संदेश देणारा दिवस आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे आज दिनांक ७ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण पाचंगे व डॉ. जितेंद्र पाचंगे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्र संचालक डॉ. संजय पारडे यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्रप्रमुख श्रीनिवास माने यांनी केली. यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी महिला सशक्तीकरण व महिलांच्या योगदानाविषयी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. किरण पाचंगे व डॉ. जितेंद्र पाचंगे यांनी महिलांविषयी जागरूकता, समाजातील महिलांचे स्थान आणि महिलांप्रती आदरभाव या विषयांवर मार्गदर्शनपर भाषण केले. तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. संजय पारडे यांनी “आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. घरातील जबाबदारी सांभाळून शैक्षणिक क्षेत्रात त्या देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे ” असे विचार त्यांनी मांडले. या केंद्रामधील काम करत असणाऱ्या प्रत्येक महिलेचा वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूजा शिरसाठ यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रवीण रणमाळे यांनी मानले. कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *