NEWS
Search

कवठे येमाई तील गायरान गट क्र. ३२६ ची शासकीय मोजणी पूर्ण; लवकरच हद्द कायम होणार! प्रशासक बी. आर. गावडे यांची माहिती; अतिक्रमणाच्या जुन्या वादाला पूर्णविराम मिळण्याची अपेक्षा

133

समाजशील न्यूज नेटवर्क शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणालगत असलेल्या बहुचर्चित सरकारी गायरान गट क्रमांक ३२६ ची आज शासकीय मोजणी पूर्ण करण्यात आली. लवकरच दिशा,हद्द कायम करून ‘क’ पत्रक मिळणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रशासक बी. आर. गावडे यांनी समाजशील न्यूज शी बोलताना दिली.
ग्रामपंचायत कवठे येमाईच्या ताब्यात असलेल्यागावठाण नजीकच्या  या सरकारी गायरान जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि. २७ ला करण्यात आलेल्या शासकीय मोजणी दरम्यान परिसरातील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे तीन तास ही मोजणी प्रक्रिया सुरू होती.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रशासक बी. आर. गावडे, ग्रामविकास अधिकारी पुनम थोरात चितळकर, ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव,माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब डांगे,सुभाष उघडे,अविनाश पोकळे,भाऊसाहेब घोडे अनेक ग्रामस्थ तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ३२६ हा अष्टविनायक महामार्गाच्या अलीकडे उत्तरेकडे असून, संबंधित जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. दुसरीकडे, अतिक्रमणधारकांच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या पलीकडील (उत्तरेकडील) काही मीटर जागेवरही त्यांचा हक्क आहे. त्यामुळे या जमिनीच्या नेमक्या हद्दीवरून दीर्घकाळापासून संभ्रम आणि वाद निर्माण झाला आहे.


शासकीय मोजणीकडे ग्रामस्थांचे लक्ष
गायरान जमिनीच्या हद्दीचा प्रश्न हा गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. आता शासकीय मोजणी पूर्ण झाल्याने जमिनीची अधिकृत हद्द निश्चित होण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिशा,हद्द कायम करून ‘क’ पत्रक प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या गायरान जमिनीच्या प्रश्नावर शासकीय मोजणीनंतर नेमका काय निष्कर्ष निघतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.हा प्रश्न निकाली लागल्यानंतर गावातील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांकडे ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते ? या कडे आता सर्वसामान्य ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *