समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील टाकळी हाजी च्या साबळेवाडी येथील बापुसाहेब नगर परिसरात जागेच्या वादातून एका व्यक्तीला शिवीगाळ व दमदाटी करून काठी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विलास गिरीधर चव्हाण (वय ३६, व्यवसाय चालक, रा. साबळेवाडी, बापुसाहेब नगर, टाकळी हाजी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, विलास चव्हाण हे घरासमोरील ओट्यावर उभे असताना त्यांच्या नातेवाइकांनी तेथे येऊन, ‘तू आमच्या जागेत राहायचे नाही,’ असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर अशोक पोपट चव्हाण याने काठीने पाठीवर मारहाण केली, तर दत्तात्रय परशुराम चव्हाण याने डावा हात पिरगळला. विक्रम राघू चव्हाण याने दगड फेकून डोक्याच्या मागील बाजूस मारल्याने विलास चव्हाण खाली पडले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.तसेच फुलाबाई राघू चव्हाण आणि मंगल परशुराम चव्हाण यांनी खाली पडलेल्या विलास चव्हाण यांना मारहाण केल्याचे, तर भिवाजी पांडुरंग चव्हाण हा काठी घेऊन अंगावर धावून आल्याचे फिर्यादी त नमूद आहे. यावेळी अशोक चव्हाण याने विलास चव्हाण यांच्या पत्नीला पतीला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
घटनेनंतर विलास चव्हाण यांना त्यांचा पुतण्या गोरख किसन चव्हाण याने मदत करून टाकळी हाजी पोलीस चौकीत नेले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.या प्रकरणी विक्रम राघू चव्हाण, अशोक पोपट चव्हाण, दत्तात्रय परशुराम चव्हाण, भिवाजी पांडुरंग चव्हाण, फुलाबाई राघू चव्हाण आणि मंगल परशुराम चव्हाण (सर्व रा. साबळेवाडी, बापुसाहेब नगर, टाकळी हाजी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वायाळ करीत आहेत.

