समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : नवरात्रोत्सव २०२६ चे औचित्य साधून स्व. गणेश घावटे पाटील प्रतिष्ठान व रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामलिंग येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ हा दिमाखदार सोहळा काल सोमवार दि. १९ ला सायंकाळी सात नंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय महिलांचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी धनकवडी, पुणे येथील वरिष्ठ पत्रकार तथा पोलीस मित्र संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक यांनाही नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक खेळ, मनोरंजन आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी (राणी) कर्डिले आणि त्यांच्या टीमने केले. महिलांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी वरिष्ठ पत्रकार श्रीमती वर्षाताई नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे महिला सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच समाजातील इतर महिलांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निचित सर यांनी प्रभावीपणे केले, तर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी (राणी) कर्डिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.महिलांचा सन्मान, मनोरंजनाची मेजवानी आणि सामाजिक कार्याचा गौरव अशा त्रिवेणी संगमातून रामलिंग येथे नवरात्रोत्सव २०२६ चा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

