समाजशील न्यूज नेटवर्क,.शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्हावरे आणि चांडोह येथे मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. न्हावरे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद होऊन एका तरुणाच्या पायावर घन मारून दुखापत केल्याचा, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या घटनेत चांडोह येथे शेतातील जनावरांसाठीचे गवत तोडण्याच्या कारणावरून वाद होऊन दगड आणि कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावरे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण
न्हावरे ते गुनाट जाणाऱ्या रस्त्यावर आप्पासाहेब बेडकर यांच्या घराजवळ दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हिराबाई रामकृष्ण बीडगर (वय ५३, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) या आपल्या मुलासह व इतर नातेवाईकांसोबत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करीत होत्या.यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील व्यक्तींनी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या वादादरम्यान प्रशांत वाघमारे याने फिर्यादीच्या मुलाच्या पायावर घन मारून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीला ढकलून शिवीगाळ करण्यात आली आणि सर्वांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी प्रशांत वाघमारे व अभिजीत वाघमारे (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही, रा. गुनाट, ता. शिरूर) यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.
चांडोह येथे गवत तोडण्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला
दुसरी घटना चांडोह, ता. शिरूर येथे दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता घडली. सुनील विठ्ठल भुजबळ (वय ३५, व्यवसाय शेती, रा. चांडोह) हे आपल्या भावासोबत शेतात गेले असता, प्रतीक सुरेश भुजबळ (वय ३२, रा. चांडोह) हा त्यांच्या शेतातील जनावरांसाठीचे गिनी गवत तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी सुनील भुजबळ पुढे गेले असता आरोपीने दगड फेकून मारल्याने त्यांच्या पाठीला दुखापत झाली. त्यानंतर हातातील कोयत्याने डोक्यात मारून दुखापत केली आणि पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी प्रतीक सुरेश भुजबळ याच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.
दोन्ही घटनांचा तपास सुरू
शिरूर तालुक्यातील या दोन घटनांमुळे मारहाण, किरकोळ कारणांवरून होणारे वाद आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
Home बातम्या पुणे शिरूर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल तर न्हावरे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद; चांडोह येथे गवत तोडण्यावरून कोयत्याने हल्ला

शिरूर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल तर न्हावरे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद; चांडोह येथे गवत तोडण्यावरून कोयत्याने हल्ला
BySamajsheel NewsOctober 20, 20260
Previous Postशिरूर पोलिसांची सरदवाडीतील राजहंस लॉजवर धडक कारवाई! अनैतिक मानवी व्यापार प्रकरणी तिघांना अटक; रोख रकमेसह ग्राहकांच्या नोंदींचे रजिस्टर जप्त
Next Postशिरूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणांची पोलिसांत नोंद,आलेगाव पागा येथे वीजचोरीचा गुन्हा; आमदाबाद वनक्षेत्रात वृद्धाचा मृत्यू, तर वडनेर खुर्द येथील तरुण बेपत्ता
