NEWS
Search

शिरूर पोलिसांची अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई! चारचाकी-दुचाकीसह २ लाख ८५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यावरही गुन्हा दाखल

51

समाजशील न्यूज नेटवर्क,.शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री, बेकायदा वाहतूक आणि हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दि. १९ ऑक्टोबर रोजी केलेल्या या कारवाईत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, देशी-विदेशी दारू, हातभट्टीची दारू, एक चारचाकी व एक दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ८५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
शिरूर शहरातील बाबुरावनगर, जिल्हा परिषद रोड, भाजीबाजार चौक परिसरात महादेव जिलबीच्या पाठीमागे तुषार शहाजी ठिटे (वय २८, रा. श्रम साफल्य निवास, बाबुराव नगर, शिरूर) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने पाच लिटर हातभट्टीची दारू आढळून आली. या दारूची किंमत ५०० रुपये आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुशील चंद्रकांत सुरवसे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.
वॅगनआरमधून देशी-विदेशी दारूची वाहतूक
शिरूर येथील गोलेगाव रोडवरील पुणे-नगर बाजूकडील सर्व्हिस रोडवर ज्ञानेश्वर जबाजी कवाड (वय ४१, रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हा ग्रे रंगाच्या मारुती वॅगनआरमधून देशी-विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी २ लाख २५ हजार रुपये किमतीची चारचाकी गाडी तसेच देशी दारूच्या १४४ बाटल्या, रॉयल स्टॅगच्या १८, इम्पीरियल ब्लूच्या ६० आणि क्लासिक गोल्डच्या ४८ बाटल्या असा एकूण २ लाख ६१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) व ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश ज्ञानदेव मुळीक यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
दुचाकीवरून दारूची वाहतूक; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
शिरूरमधील बी. जे. कॉर्नर परिसरात हेमाराम देवाराम देवासी (वय ४०, रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा काळ्या रंगाच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून देशी दारूची बेकायदा वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि चार हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या १०० सीलबंद बाटल्या असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) व ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश ज्ञानदेव मुळीक यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार खबाले तपास करीत आहेत.
हद्दपार आदेशाचा भंग; आणखी एक गुन्हा दाखल
शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना शरद बन्सी मल्लाव (वय २८, रा. काची आळी, शिरूर) हा हुडको कॉलनी परिसरात आढळून आला. त्याच्या हद्दपारीसंदर्भातील अभिलेख तपासला असता, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, शिरूर यांच्या कार्यालयाकडील आदेश क्रमांक १६३/फौज/एस.आर. २२२/२०२६, दि. ९ ऑक्टोबर २०२६ नुसार त्याला शिरूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट झाले.पूर्वपरवानगी न घेता हद्दीत प्रवेश करून हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अशोक भगवान चितारे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार गवळी पुढील तपास करीत आहेत.
अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई
शिरूर पोलिसांनी एकाच दिवशी केलेल्या या कारवाईत अवैध दारू विक्री, वाहतूक आणि हद्दपार आदेशाचा भंग अशा चार स्वतंत्र प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ८५ हजार ९२० रुपये आहे. या सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *