मंगरूळपीरची बिरबलनाथ महाराजांची यात्रा म्हणजे गोड आठवणींचे मोठे गाठोडे, हवेहवेसे वाटणारे, अवीट आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मधाचे जणू गोड पोळेच…
फेब्रुवारी महिन्यातील माघ पौर्णिमा, बोचरी बारीक थंडी हा यात्रेचा कालावधी. सुरुवातीला, पूर्वी बांबूच्या तट्ट्यांची दुकाने येऊन यात्रेची सुरुवात करीत त्यानंतर दगडी जातेपाटे, खलबत्ते, वरवंटे यांची दुकाने ,त्यांची ‘टकटक’ संपूर्ण यात्रा भर चालत असे. सर्वात आधी येऊन सर्वात उशिरा जाणारी ही दुकाने असत. यात्रेची सुरुवात, गुरुमुर्ती बिरबलनाथ महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर 12 फेब्रुवारी 1929 पासून झाली. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली मंगरूळपीरची भूमी बिरबलनाथांची ही यात्रा दरवर्षी चार दिवस गजबजलेली असते. पहिल्या दिवशी पूजेने यात्रेची सुरुवात होते. सायंकाळी संतश्रेष्ठ गाडगेबाबांची कीर्तनातून व्याख्यान होत असते. दुसऱ्या दिवशी पाचलेगावकर महाराजांचे भूत पिशाच्य विरोधी व्याख्यान व वीरश्रीयुक्त पोवाडा यांचा कार्यक्रम होई. तिसऱ्या दिवशी सायंकाळी अग्नी वरून चालण्याचे प्रयोग प्रमाणात विश्लेषणासह पाचलेगावकर महाराज करीत असे. यात्रेत आकर्षक व उत्कृष्ट मालाची मांडणी करणाऱ्या यात्रेतील दुकानदारांचा गौरव सुद्धा यात्रा समिती करतात. असा उल्लेख 12 फेब्रुवारी 1930 रोजी यात्रेनिमित्त छापलेल्या छापील पत्रकात नमूद केला आहे.
पुढे हळूहळू यात्रेचे स्वरूप बदलत गेले. 1930 ते 1960 पर्यंतचा कालखंड अगदी साचेबंद होता. महाराष्ट्रातील तत्कालीन लोकप्रिय तमाशांचे संच मंगरूळपीरच्या यात्रेत हजेरी लावत.पुढे मात्र तमाशाचा काळ लयाला जाऊन यात्रेत सिनेमा युग अवतरले. टुरिंग टॉकीज मध्ये एक धार्मिक एक मराठी व एक मारधाड पट किंवा सामाजिक आशय गर्भ सिनेमा असे. यात्रेत किमान नऊ ते दहा टुरिंग टॉकीज येत असत. संपूर्ण रामायण, संपूर्ण महाभारत, श्रीकृष्ण लीला, हे देवपट तर एक गाव बारा भानगडी, अशा रंगल्या रात्री, डोंगरची मैना,सुशीला, पिंजरा, चंदनाची चोळी,बन्या बापू,याशिवाय दादा कोंडके चा सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,पांडू हवालदार इत्यादी विनोद पट असत. यानंतर क्रेझ आली ती दे दनादन पटाची.राणी मेरा नाम, रिवाल्वर राणी, हंटरवाली,पिस्तूल वाली इत्यादी मद्रासी सिनेमे गर्दी खेचत नौजवान सारखे दारासिंहाचे सिनेमे त्यावेळी यात्रेचे आकर्षण असत.
जवळपास 2010 पर्यंत यात्रेतून वर्षभर लागणाऱ्या तसेच नेहमी उपयोगात येणाऱ्या वस्तूंची खरेदी यात्रेतून लोक करीत असत. वर्षभर पैसा जुळवून तमाम स्त्रिया यात्रेतून अंगावर घालावयाची आभूषणे याशिवाय स्वयंपाकाची भांडीकुंडी, जाते- पाटे, खलबत्ता लोणच्याकरिता बरण्या, गुंड-भरणे, कोपर, टोपले इत्यादी गृहोपयोगी साहित्य खरेदीचे प्रभावी माध्यम यात्रा असे. शेतकरी वर्ग बैलगाडी चाके, दमण्याची लोड-कापड पेरण्यांची अवजारे यात्रेमध्ये खरेदी करीत असत. काही विशेष जातीतील लोक मरीमायचे मंदिरासमोर तत्कालीन यात्रा मैदानात सोयरीक संबंध पक्के करीत. ही प्रथा 2000 पर्यंत सुरू होती. शालेय विद्यार्थ्यांकरीता बिरबलनाथांची यात्रा म्हणजे एक आनंद पर्वणी असे. यात्रेत टुरिंग टॉकिजांचे आगमन झाल्याबरोबर गावातील सर्व शाळा ओस पडत. कोणत्या टॉकीज मध्ये कोणते सिनेमे आहेत याची प्रत्येकाला उत्कंठा असे. खानदान, घराणा,कच्चे धागे, जंगली, आन मिलो सजना, शोर,छोटा भाई,कुंवारा बाप,गौरी, मेरा गाव मेरा देश, हिरा,प्राण जाये पर वचन न जाये इत्यादी सिनेमे राजकमल, किशोर,अमरदीप, बिरबलनाथ, श्याम,वसंत आनंद, जयानंद,सदानंद, विजयानंद या तत्कालीन टुरिंग टॉकीज मध्ये येत असत. 1970 नंतर यात्रेतील टॉकीज मध्ये दुपारी साडेबारा व साडेतीन वाजता मॅटिनी शो सर्वप्रथम सुरू झाला.
सुरुवातीच्या काळात एखाद्या सराईत जादूगाराप्रमाणे भासणारा फोटोग्राफर काळया पडद्याच्या कॅमेऱ्यात तोंड घालून फोटो काढत असे. एकत्र कुटुंब पद्धतीच्या काळात अख्या कुटुंबाच्या फोटोची तेव्हा क्रेझ होती. त्यानंतर मोठ्या कॅमेऱ्याचा काळ बदलला छोटे कॅमेरे आले काळा पडदा भूतकाळात जमा झाला. 1985 ते 2000 हा पंधरा वर्षाचा कालखंड फोटोग्राफीच्या उल्लेखाचा काळ होता. यात्रेत तीन-चार फोटोग्राफर येत असत. ही मंडळी एक रुपयात एक फोटो देत असत देत असत. नवरा-बायको, भाऊ भाऊ, भाऊ-बहीण, यार -मित्र यांची फोटो काढण्याकरता भरपूर गर्दी राहत असे. यात्रेमध्ये जबरदस्त धाडसाचे प्रतीक म्हणजे ‘मौत का कुवा ‘ असे. ज्यात मोटरसायकली मारुती कार गोलाकार लाकडी पाट्यांवरून जीवावर उदार होऊन चालवत असत. प्रेक्षकांनी खेळ चालू असताना दिलेला रुमाल नोट अथवा खाऊ सहजपणे कलाकार वाहन चालक स्वीकारत असत. मुलांना, प्राणीमात्रास म्हणजे हत्ती, उंट,घोडे, बिबटा,माकड,साळिंदर,रानमांजर,लांडगा यांना अगदी जवळून पाहण्याची संधी यात्रेतील सर्कशीच्या निमित्ताने मिळत असे, तो काळ टीव्ही गुगल अस्तित्वात नसलेला काळ होता.
बिरबलनाथ महाराजांच्या यात्रेत, दुकानदारांचे एक वेगळे विश्व असे. चार दिवसापासून ही यात्रा दहा दिवसापर्यंत पोहोचली.आज ही यात्रा सात दिवसाची असते.खेळणी, कटलरी,भांडी,हार्डवेअर,हॉटेल व्यवसाय,सिनेमा,लोकनाट्य मंडळ, सुतारी,लोहारी,साहित्याची दुकाने,जाते-पाटे,वरवंटे, भजी जिलेबी,फुटाणे रेवड्यांची छोटी दुकाने याशिवाय सुरुवातीचे लाकडी आकाश पाळणे व त्यानंतर आलेले आकाशाला गवसणी घालणारे विविध प्रकारचे भव्य झुले यांचे व्यावसायिक यात्रेत दरवर्षी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवत. यात्रेच्या कमाईवर हे दुकानदार आपले खाजगी कर्ज फेडण्याची इच्छा ठेवत मुलीचे लग्न उरकण्याचे मनसुबे बोलत. काही काटकसरी दुकानदार शेतीचा एखादा तुकडा विकत घेण्याची भाषा बोलत तर काही हौशी दुकानदार सोन्याचा दागिना घरधणीनच्या अंगावर घालण्याची अभिलाषा बाळगून असत. सर्वांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मंगरूळपीरच्या यात्रेत रिकाम्या खिशाने खेळण्याच्या दुकानांसमोर व्यर्थ फिरणाऱ्या गरिबांच्या मुलाचे मनोगत एका कवीने साहित्यातून चितारले तो म्हणतो, “गरीबो के बच्चो का सब्र भी है बेमिसाली ; जा रहे है मेले और जेब खाली!”
अशी ही मंगरूळपीरची बिरबलनाथांची यात्रा आणि असा तिचा गुणगौरव करण्यासाठी हा लेख प्रपंच..