समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेसाठी आता महाविकास आघाडी व महायुती चे दोन्ही उमेदवार सज्ज झाले असून दोन्ही उमेदवार कुणबी समाजाचे असल्याने लोकसभा निवडणूकी प्रमाणे जातीय राजकारणाचा फायदा कुणाला होणार याची चर्चा आता मतदार संघात रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत सध्याचे विद्यमान आमदार किसन कथोरे व महाविकास आघाडीचे आत्ताचे उमेदवार सुभाष पवार हे महायुतीत एकत्र होतें. मात्र आता सुभाष पवार यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीची कास धरल्याने मुरबाड विधानसभेतील एकतर्फी लढत काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. माजी खासदार कपिल पाटील व विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ही अपयश आल्याने लोकसभेला महायुतीला पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत आता कुणबी समाजाचे दोन्ही उमेदवार उभे ठाकल्याने कुणबी मतदार विभागले जाऊन आगरी,आदिवासीं, दलीत मुस्लिम या मतांवर उमेदवारांची भिस्त असल्याने मुरबाड विधानसभा रंगतदार ठरणार आहे.