समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा,सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ग्रामीण विकास शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांच्या सेवापुर्ती निमित्त कार्यगौरव व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. येथील बापूसाहेब गावडे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी गृह,वीज,उच्च व तंत्रशिक्षण,सहकार मंत्री,विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा या भागाचे विकास पुरुष आमदार दिलीपराव वळसे पाटील हे होते. तर पारनेर चे लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते सर,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड प्रदीपदादा वळसे पाटील,मानसिंग भैया पाचुंदकर पाटील,प्रकाशराव पवार,मधुकरराव उचाळे,सुनीता ताई गावडे,राजेंद्र गावडे,अनेक गावाचे सरपंच,पदाधिकारी,मित्रपरिवार, शिक्षक,स्नेही,विद्यार्थी,विध् यार्थिनी,महिला व अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या कार्यकाळात प्राचार्य आर बी गावडे यांनी विद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. एक शिस्तप्रिय व अभ्यासू शिक्षक म्हणून त्यांची मोठीच ख्याती असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात विराजमान असलेले पाहावयास मिळतात. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन,मान्यवरांचे व ज्यांची सेवापूर्ती झाली त्या आर बी गावडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
ज्यांनी शिक्षणाच्या मंदिरात निष्ठेने, प्रेमाने आणि कर्तव्यभावनेने दीप प्रज्वलित केला – आणि तो म्हणजे आपले लाडके प्राचार्य आर. बी. गावडे सर.गावडे सर म्हणजे शिस्त, सरळपणा, अभ्यास, कार्यतत्परता आणि नेतृत्व यांचं मूर्त स्वरूप. १९९२ मध्ये गुरुनाथ विद्यालय, वडनेर येथून सुरू झालेलं त्यांचं प्रवासपथ, आज बापूसाहेब गावडे विद्यालयापर्यंत आलं आणि त्यात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळवलं. केवळ शिक्षक म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक, एक बंधू, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांच्या हृदयात स्थान मिळवून गेले. स्व. प्रा सोनभाऊ गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जिथं सोयी नव्हत्या, तिथं त्यांनी संधी निर्माण केल्या. वेड्याबाभळीच्या जागी मैदान उभं केलं, टाकळीच्या माळरानावर ज्ञानमंदिर उभं केलं. ३२ वर्ग खोल्यांची इमारत असो, १६५० झाडांचं नंदनवन असो, की डिजिटल युगाशी सुसंगत आधुनिक तंत्रज्ञान – हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीचं, परिश्रमाचं फलित आहे.
“मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा” स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक मिळवणं, हे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं मोठं उदाहरण आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कृषी प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, आणि सामुदायिक विवाह,समाजोपयोगी कार्यांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच लक्षणीय राहिला आहे.
गावडे सर हे फक्त शिक्षक नाहीत ते एक विचार आहेत, एक चळवळ आहेत, आणि एक प्रेरणा आहेत. त्यांनी दाखवलेली वाट आजच्या तरुण शिक्षकांसाठी दीपस्तंभ सारखी आहे जी अंधारातही योग्य मार्ग दाखवते. कार्यक्रमात मान्यवरांची भाषणे गावडे यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ झाल्यानंतर उपस्थितांचे आभार मानून आलेल्या सर्व पाहुण्यांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला.