समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत सिंचन,पाणीपुरवठा,वीज आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कुकडी प्रकल्पातील महत्त्वाचे डिंभे धरण सुरक्षिततेचा प्रश्न या बैठकीत अग्रक्रमाने मांडण्यात आला. धरणातून होत असलेली गळती थांबवण्यासाठी १७१.५९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असून त्याला तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे धरणाचे आयुष्य वाढण्यास आणि भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यास मदत होणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरात अखंडित वीज पुरवठ्यासाठी डिंभे येथे ३३/११ के.व्ही. उप केंद्र उभारण्याची गरज ही अधोरेखित करण्यात आली. यासाठी जलसंपदा विभागाची जमीन महावितरणकडे हस्तांतरित करून प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची विनंती करण्यात आली.
मंचर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता १३३.५१ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही तातडीने मंजुरी देण्याचा मुद्दा मांडण्यात आला.या योजनेमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होण्याची अपेक्षा आहे.धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पूर्ण केलेल्या ९ उपसा सिंचन योजनांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे सुमारे १२०० एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या योजनांना तातडीने वीज पुरवठा देण्याचे निर्देश देण्याची मागणी ही वळसे पाटील यांनी यावेळी केली.
तसेच कुकडी प्रकल्पांतर्गत कळमजाई, बोरघर आणि फुलवडे या तीन नवीन उपसा सिंचन योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत ही चर्चा झाली. या योजनांमुळे सुमारे १५८५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.“मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे,” असे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.

