NEWS
Search

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाचा माणुसकीचा दीप! ३ गावात दिवाळीपूर्वी गोरगरिबांना २५० शिधा किटचे वाटप; राज्यातील पहिला अभिनव व प्रेरणादायी उपक्रम

376

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूने पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी शिरूर तालुक्यातील कानूर मेसाई, मिडगुलवाडी आणि कवठे येमाई परिसरात तब्बल २५० शिधा किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम राज्यात पहिलाच असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले असून, सर्व स्तरांतून या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
दिवाळीच्या सणाची चाहूल लागली असतानाच दुष्काळाचे सावट गडद होत आहे. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबाच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलावा, या भावनेतून महासंघाने हा उपक्रम हाती घेतला. हरभरा डाळ,पोहे,साखर,तांदूळ,रवा आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली शिधा किट प्रत्यक्ष गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमासाठी पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी, अनिरुद्ध पळशीकर (कोथरूड), महिला आघाडीच्या सरचिटणीस आकांक्षा देशपांडे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष स्वाती बहुलकर, सरचिटणीस सुरेश कुलकर्णी (कोथरूड), वारजे शाखाध्यक्ष अभिनव पाठक, माधव कुलकर्णी, कमलाकर कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, शिक्रापूर शाखेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपाली जोशी यांच्यासह महासंघाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.स्थानिक पातळीवर ही या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य लाभले. शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्य डॉ.कल्पना पोकळे,कान्हूर मेसाई येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे दळवी, कवठे येमाई येथील युवा कार्यकर्ते विशाल गायकवाड, ​सामाजिक कार्यकर्ते दत्ता घोडे कैलासराव बच्चे,अनिल रायकर,गणेश काका जोशी, रामदास पोकळे,सोमनाथ पंचरास,कैलास बांगर,सुरेश काका गोरे,अमोल शिंदे तसेच मिडगुलवाडी येथील ग्रामस्थांनी गरजू कुटुंबांची निवड करून शिधा किट योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचे योगदान दिले.


कवठे येमाई येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात सुमारे १०० गरजू कुटुंबांना शिधा किटचे वाटप करण्यात आले. उर्वरित किट अन्य ठिकाणी गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.दुष्काळी परिस्थितीचा विचार करून भविष्यातही अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख मदतकार्य राबविण्याचे नियोजन असल्याचे पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
यावेळी पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांनी कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, “दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, विधायक आणि इतर सामाजिक संस्थांना प्रेरणा देणारा आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन गरजू माणसाच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.”
तर सामाजिक कार्यकर्ते अनिल रायकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना, आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महासंघाने निःस्वार्थ भावनेने अधिकाधिक लोकाभिमुख उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दिवाळीच्या प्रकाशात माणुसकीचा उजेड!
सणासुदीच्या काळात गरजूंच्या घरात आनंदाचा दिवा पेटविणारा पुणे जिल्हा ब्राह्मण महासंघाचा हा उपक्रम केवळ अन्नधान्य वाटपापुरता मर्यादित नसून सामाजिक एकोपा, माणुसकी आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. संकटाच्या काळात समाजातील गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, हाच या उपक्रमाचा खरा संदेश आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *