मुंबई (समाजशील वृत्तसेवा) : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.