शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – करोडो भारतीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिन म्हणजे च चैत्र शुक्ल नवमी स श्रीरामनवमी उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील कवठे येमाई येथील श्री विठ्ठल रुख्मिणी,श्रीराम,सीतामाई मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी हभप अरुण महाराज कुलकर्णी (उंबरेकर) यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली. यावेळी जेष्ठ कीर्तनकार हभप हिरामण महाराज कर्डिले,प्रताप महाराज पाटील,आबासाहेब मुखेकर,नितीन मुखेकर,फ्रेंडशिप प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


देवालयाचे विश्वस्त कुमार गोरे पाटील व गोरे परिवार यांनी कार्यक्रमाचे सर्वोत्कृष्ट आयोजन केले होते.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून अंतरंग व गाभारा ही आकर्षक सजविण्यात आला होता.मंदिरासमोरील भव्य प्रांगणात आकर्षक मंडप व्यवस्था करण्यात आली होती.अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक थोर देणगीदार,ग्रामस्थांची खासकरून महिलांची या कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती. बरोबर बारा वाजता प्रभू रामचंद्रांचा पाळणा गाण्यात सुरुवात करण्यात आली.व त्यानंतर जन्मसोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला.त्यानंतर आरती,महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.