टाकळी हाजी,साबळेवाडी परिसरात केबल चोरीचे सत्र सुरूच -चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-शेतकऱ्यांतून मागणी 

324
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील केबल चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील टाकळी हाजी येथील शिनगरवाडीतील चार शेतकऱ्यांच्या कुकडी नदीवरील कृषी पंपाच्या केबलची चोरी झाल्याने व साबळेवाडी परिसरात ही घोडनदी जवळ केबल चोऱ्या व कापल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
       येथील अशोक सहादू पखाले, सखाराम गेणभाऊ खामकर, सणस विठोबा खामकर, बंडू पंढरीनाथ खामकर यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली आहे. सकाळी शेतकरी पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना रात्री केबलची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. आधीच नदीला पाणी नाही, रात्रीत नदीला जमा झालेले थोडेफार पाणी सकाळी शेताला देवून कसेबसे पिक पाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असताना केबल चोरीने पुन्हा खर्च वाढल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यापूर्वी बेट भागासह कवठे येमाई,सविंदणे,घोडनदी किनारी असणारे शेती पंप अशा अनेक ठिकाणी केबल चोरीस गेल्या असून त्याचा तपास करण्यात पोलीस मात्र अपयशी ठरत असल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे पोलीस या घटना गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात काम करत असताना वाढत्या तापमानात जीवाची परवा न करता या भागातील बळीराजा कष्ट करत आहेत. दुग्धव्यवसाय, तरकारी पिके घेवून प्रपंचासाठी पै पै गोळा करून उदरनिर्वाह करत असताना पुढील पिकासाठी तयार केलेले भांडवल या चोऱ्यांमुळे खर्च होत आहे.
         पोलिसांचे नक्की चाललंय काय?
टाकळी हाजी येथे पोलीस चौकी असून या भागात खुले आम सुरू असलेले अवैध धंदे, गौण खनिज उत्खनन , विद्युत रोहित्र तसेच कृषी पंप आणि केबल चोरी, शेतमाल व कृषी साहित्य चोरी या प्रकारांना अभय नक्की कुणाचे ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या भागात सातत्याने जाणवत असलेली बिबट्याची दहशत आणि चोरीचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची पुरती झोप उडाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *