शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.०८) रात्री ११ च्या दरम्यान व काल दि. ०९ ला कवठे येमाईच्या रोहिलवाडीत रात्रभर मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत असले तरी वेगवान वारे व तुफानी पावसाने रोहिलवाडीत अनेक ठिकाणी उभ्या ऊस पिकाला झोडपल्याचे शेतकरी विलासराव रोहिले,खंडू पवार,हरिचंद्र पवार यांनी सांगितले. याच बरोबर टँकर सुरू असलेल्या कान्हूर मेसाई,पाबळ, केंदुर परिसरातील गावांतही पावसाने हजेरी लावल्याने या गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी राजे दळवी यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील टाकळी हाजी, सविंदणे, कवठे येमाई, पाबळ, मलठण, पिंपरखेड, न्हावरे, मांडवगण फराटा परिसरातील गावांमध्ये शनिवारी (दि.०८) रात्री उशिरा पावसाने दमदार हजेरी लावली. शिरूर शहराप्रमाणे तालुक्याच्या ग्रामीण भागात पडलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी असून खरीपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पडलेल्या पावसामुळे वातावरणात उकाडा कमी होण्यास मदत झाली असून अशाच दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक गावातील वीज वारंवार गायब होती त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा तीव्र उन्हाळा जाणवत होता त्यातच पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भीषण बनला होता. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे पावसाचा जोर जर असाच राहिला तर काही प्रमाणात दुष्काळी भागातील पाणी टंचाई कमी होणार आहे. शनिवारी दुपारपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे तीन तास हा पाऊस बरसला. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे विलासराव रोहिले,रमेश पोपट रोहिले,राहुल रोहिले,नवनाथ रोहिले,सुधीर रोहिले,रोहन बाबाजी रोहिले यांनी सांगितले.